Wed, Jul 17, 2019 18:34होमपेज › Solapur › अवयवदानामुळे सख्ख्या बहिणींना जीवदान

अवयवदानामुळे सख्ख्या बहिणींना जीवदान

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 9:37PMसोलापूर : प्रतिनिधी

ब्रेनडेड झालेल्या सतीश नामदेव पलगंटी यांच्या मूत्रपिंडामुळे सख्ख्या बहिणींना जीवदान मिळाल्याची घटना नुकतीच सोलापुरात घडली. या अवयवदानामुळे सोलापुरात अवयवदान चळवळ वाढत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

घडलेली घटना अशी की, सतीश नामदेव पलगंटी हे गेल्या 4 वर्षांपासून रक्‍तदाबाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांना 11 मार्च 2018 रोजी रक्‍तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना पुढील उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल केले. तेथे सिटी स्कॅन काढल्यानंतर मेंदूत रक्‍तस्त्राव झाल्याचे दिसून आले. त्यांना पुढील उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये 13 मार्च रोजी दाखल केले. येथे उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्यानंतर ते ब्रेनडेड झाल्याचे समजले. 

यावेळी यशोधरा हॉस्पिटलमधीलच अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास येमूल हे पलगंटी यांचे नातेवाईक. त्यांनी अवयवदानाबद्दल नातेवाईकांना माहिती दिली. त्यासाठी तयार केले आणि सतीश पलगंटी यांच्या पत्नी कल्पना आणि बंधू राजेश यांनी दु:खद अवस्थेतही अवयवदानाचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे यशोधरा हॉस्पिटलकडून शासकीय कमिटीला अवयवदानाची माहिती दिली. या कमिटीने प्रतीक्षा यादीत सोलापुरातीलच दोन सख्ख्या बहिणींची नावे कळवली. त्यानुसार सतीश पलगंटी यांची दोन मूत्रपिंडे या दोन सख्ख्या बहिणींना मिळाली. तर यकृत पुण्यातील रुग्णाला देण्यात आले. यासाठीची शस्त्रक्रिया डॉ. विजय शिवपुजे, डॉ. कमलेश बोकील यांनी केली आणि यासाठी यशोधरा हॉस्पिटलमधून पुण्यापर्यंत 14 मार्च रोजी सकाळी 8 वाजता ग्रीन कॅरीडॉर तयार करण्यात आला होता. 

तसेच दोन मूत्रपिंडे दोन रुग्णांवर एकाच वेळी प्रत्यारोपण करण्यासाठी यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. विजय शिवपुजे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. कृष्णा, डॉ. शेहरोज बॉम्बेवाला, डॉ. मंजिरी देशपांडे, डॉ. राहुल स्वामी यांनी केले. तर यासाठी डॉ. सचिन बलदवा, डॉ. आशिष भुतडा, डॉ. मुक्तेश्‍वर शेटे, डॉ. पौर्णिमा सालक्‍की, डॉ. संदीप लांडगे, धनंजय मुळे आदींनी परिश्रम घेतले.

दहा वर्षांची प्रतीक्षा संपली
मूत्रपिंड मिळालेल्या सख्ख्या बहिणी या दहा वर्षांपासून डायलिसीसवर होत्या. त्या वेळोवेळी उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये येत होत्या. त्यांना अवयवदानाची माहिती देण्यात आली होती. योगायोगाने एकाच रुग्णाची मूत्रपिंडे एकाच वेळी मिळाली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. यामुळे या दोन सख्ख्या बहिणींकडून पलगंटी कुटुंबीय व हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.