Sat, Mar 23, 2019 02:08होमपेज › Solapur › साहेब, शिष्यांच्या थकबाकीचे बघा जरा

साहेब, शिष्यांच्या थकबाकीचे बघा जरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : महेश पांढरे  

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या शंभर वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. बँकेने अनेक सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या जीवनात आर्थिक पहाट निर्माण केली असली तरी या शंभर वर्षांत यशस्वी वाटचाल करणार्‍या बँकेला मात्र संचालक मंडळातील काही संचालकांच्या संस्थांनी आर्थिक अडचणीत आणले आहे. त्यामुळे बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीच लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. स्वत: साहेबांनीच या संचालकांची कानउघडणी करावी, अशी अपेक्षा आजच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित केल्यास वावगे ठरणार नाही.

सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी आणि कष्टकर्‍यांसाठी वरदायिनी ठरलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्र आणि कृषी क्षेत्रातील अनेक शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून जिल्ह्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. गेल्या शंभर वर्षांत सचोटीने व्यवसाय करून बँकेने जिल्ह्यात मोठी विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळे निराधार योजनेपासून ते बचत गटांच्या महिलांपर्यंतचे सर्व व्यवहार आजही मोठ्या विश्‍वासाने जिल्हा बँकेत पार पाडले जातात. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांत बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असून यासाठी संचालक मंडळाच्या संस्थांच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संचालकांच्या बगलबच्चांनी मोठमोठी कर्जे उचलली असून ती फेडलीच नाहीत.

अनेकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक रकमेची कर्जे उचलली आहेत. त्यामुळे बँकेला कायदेशीर मार्ग अवलंबून वसुली करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती कोलमडली असून गेल्या दोन वर्षांपासून उद्योग व्यवसायाबरोबरच शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यासही जिल्हा बँक असमर्थ ठरली आहे. त्यामुळे तीन हजार कोटींचा टप्पा गाठणारी ही जिल्ह्याची वरदायिनी आज आर्थिकदृष्ट्या हतबल का झाली, याचा विचार आता जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी करणे गरचेचे आहे. अनेक संचालकांच्या संस्थांकडे बँकेची जवळपास 500 ते 700 कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत.

त्यामुळे या संचालकांनी आता बँकेकडे चांगलीच पाठ फिरविली आहे. त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यापैकी अनेक संचालक गेल्या दोन-तीन वर्षांत संचालक मंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहिलेले नाहीत आणि हीच मंडळी आज पार पडत असलेल्या शतकमहोत्सवी सोहळ्यात शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या सोहळ्यादरम्यानच दस्तुरखुद्द पवार साहेबांनी या संचालकांचे कान टोचणे अपेक्षित असून त्यांच्याकडून सनदशीर मार्गाने जर वसुली झाली तर बँकेचा खर्‍याअर्थाने शतकमहोत्सव साजरा होईल आणि सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या अपेक्षा पुन्हा पल्लवीत होतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्‍त केली तर वावगे ठरणार नाही. 

Tags : Solapur, Solapur News, Sir, outstanding, balance, disciples


  •