Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी उत्साहात

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी उत्साहात

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:24PMपंढरपूर  : प्रतिनिधी

रंगपंचमीनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणीची पाद्यपूजा करून डफाची विधीवत पूजा करीत पारंपरिक धार्मिक वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली. कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर केशरचा कोरडा रंग टाकण्यात आला. या रंगपंचमी सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस रंगपंचमीनिमित्त वसंत पंचमी ते रंगपंचमी या दरम्यान पांढरा पोशाख व पांढरी पगडी परिधान करण्यात आली होती. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य व नगराध्यक्षा साधनाताई भोसले, शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे यांनी रंगपंचमी सोहळ्यात उपस्थिती लावली.  

श्रींच्या मूर्तीवर रंगाची उधळण करण्यात आल्यानंतर मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते मानाच्या डफाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नामदेव पायरी ते पश्‍चिमद्वार, चौफळा ते नामदेव पायरी अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कलगीवाले, तुरेवाले सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी डफावर रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली. या मिरवणुकीत डफवाल्यांसह नागरिक, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.