Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Solapur › श्री वीरतपस्वी आत्मज्योत मिरवणूक भक्‍तिभावात

श्री वीरतपस्वी आत्मज्योत मिरवणूक भक्‍तिभावात

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय... तपोरत्नं योगिराजेंंद्र शिवाचार्य महाराज की जय... डॉ. धर्मरत्न मल्‍लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय’ या जयघोषात श्री बृहन्मठ होटगी मठाची श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव मिरवणूक भक्‍तिमय वातावरणात पार पडली.

श्री बृहन्मठ होटगी मठाचे लिंगैक्य श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या 62 व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कसबा येथील होटगी मठात पहाटे 2.10 वाजता श्री वीरतपस्वी आत्मज्योतीचे विधिवत पूजन, महामंगलारती व प्रज्वलन चिटगुप्पाचे ष.ब्र. गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, सुलतानपूरचे गंगाधर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पूज्य महास्वामी यांना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली. यावेळी धानय्या मठपती, स्वामीनाथ कलशेट्टी, नंदकुमार धाये, सुभाष हांडगे, शांतय्या स्वामी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव कुंभार यांनी श्रद्धांजली वाहिली.

पहाटे 5.15 वाजता उत्तर कसबा होटगी मठातून डॉ. धर्मरत्न मल्‍लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या व सर्व शिवाचार्य गणांच्या हस्ते आत्मज्योतीचे पूजन व महामंगलारती करून मिरवणुकीला प्रारंभ केला. मिरवणुकीत अग्रभागी पंचरंगी व भगवा झेंडा हाती घेतलेले बटू, हलग्या, बँड पथक, अध्यापक विद्यालयाचे दाक्षिणात्य नृत्यपथक, पथनाट्यपथक, एस.व्ही.सी.एस., नेताजी सुभाषचंद्र बोस, राजराजेश्‍वरी शाळेचे आर.एस.पी. स्काऊट व विद्यार्थी, पुरंत, वीरतपस्वी आत्मज्योत, वीरतपस्वी पालखी, श्री वीरतपस्वी रथ या क्रमाने ही पदयात्रा शिवनामाचे जप व जयघोष करीत अतिशय शिस्तबद्ध रितीने होटगी गावाकडे प्रयाण झाली. तीर्थचे सद्भक्‍त पालखी सेवा केली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी मंगल चक्रे, श्रृती दर्गो-पाटील, प्रियंका भांजे, सुवर्णा कल्याणशेट्टी, अविनाश चिलगेरी, अमृता चिंचोळी, पूजा निलंगे, रुपा कुताटे आदींनी रांगोळ्याच्या पायघड्या घालून गुरुचरणी सेवा समर्पित केली. 

मान्यवरांची उपस्थिती 
पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, नगरसेवक शिवानंद पाटील, वैभव हत्तुरे, माजी नगरसेवक केदार उंबरजे, चंद्रकांत रमणशेट्टी, बसवराज शास्त्री हिरेमठ, बृहन्मठ होटगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णाराव कुंभार, सहसचिव शांतय्या स्वामी, संचालक राजशेखर फताटे, सिद्धेश्‍वर नरोळे, प्रभूराज विभुते, चिदानंद वनारोटे, मल्‍लिनाथ हिरेमठ, उत्तम पाटील, नितीन गंगाधर, वसंतराव  लवंगे, चन्नवीर दुलंगे, शंभू हुक्केरी, अ‍ॅड. शिवशंकर बिराजदार, संतोष कुंभार, प्रा. विजय बिराजदार, धर्मराज कारले, सुरेश तानवडे यांच्यासह बृहन्मठ होटगी संस्थेचे सर्व शाखेचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दाक्षिणात्य नृत्य व पथनाट्य
एस.व्ही.सी.एस. अध्यापक विद्यालयातील 32 छात्राध्यापिकांनी दाक्षिणात्य कर्नाटकी वेशभूषेसह ‘यक्षगान’ नृत्य सादर करून भक्‍तांचे लक्ष वेधून घेतले. तसेच 11 छात्राध्यापकांनी व्यसनमुक्‍ती पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन घडविले.