Thu, Jul 18, 2019 21:43होमपेज › Solapur › श्रावण सोमवार विशेष : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र रामलिंग

श्रावण सोमवार विशेष : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र रामलिंग

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 11:56AMबार्शी : गणेश गोडसे 

सोलापूर - उस्मानाबाद जिल्ह्याच्या  सरहद्दीवर  येडशी पासून  तीन किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या पर्वतरांगा व दंडकारण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान व तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले श्रीक्षेत्र रामलिंग म्हणजे भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.

Image result for रामलिंग

सध्या रामलिंग या तीर्थक्षेत्राच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू आहे.  पावसाच्या प्रारंभीच प्रथमच येथील परिसरात वरूणराजाने अल्पशी हजेरी लावल्यामुळे येथील धबधबा कांही काळ सुरू होता. मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू सध्या बंद अवस्थेत असला तरी येथील निसर्गरम्य परिसर अल्पपावसानेही हिरवाईने नटल्याचे दिसून येत आहे.   

मायावी हरिणाला पकडण्यासाठी गेलेल्या प्रभू रामचंद्रांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन सीता मातेचे अपहरण करून पळालेल्या रावणाचा पाठलाग करून सीतेला सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या जटायू पक्षाचे आणि रावणाचे युध्द या प्रसिध्द अशा रामलिंग याठिकाणीच झाल्याची आख्यायिका सांगितली जाते.

Image result for रामलिंग

युद्धानंतर याठिकाणी प्रभू रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायू पक्षाला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले ते पाणी जटायूला दिले.तसेच तेथेच त्यांनी स्वत: लिंगाची स्थापना करून शिवआराधना केली.पुजेसाठी बाण मारून पाणी उपलब्ध केले ते ठिकाण आज गायमुख म्हणून सुपरिचित आहे.      
  येथील मंदिरात अखंड ध्वनी तेवत असते. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात आणि चंपाष्ठमीला येथे मोठी यात्रा भरते. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, अंबाजोगाई, पुणे आदी जिल्ह्यांसह महाराष्ट्रातून विद्यार्थी सहलीसाठी, तर भाविक या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी येत असतात.

Image result for रामलिंग

या मंदिरात सन 1940 ते 50 च्या दरम्यान म्हैसूरकर स्वामी होऊन गेले होते.त्या स्वामी महाराजांची ध्यान धारणा करण्याचे ते घर आजच्या काळातही सुस्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. स्वामी करपात्री महाराज, स्वामी शंकराचार्य आदी महती या श्रद्धास्थानी येऊन गेल्याचा इतिहास आहे. उत्रेश्‍वर पिंपरीचे कै.ज्ञानेश्‍वर माऊली महाराजांचे रामलिंग हे अतिशय आवडते स्थळ होते.     ‘वेदश्री’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘येडशी’ हे नाव तयार झाले असून संतभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच जटायूच्या बलिदानाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र रामलिंगला भाविकांच्या मनात अढळ स्थान आहे. 

 

आर्य समाजाचे गुरूकुल वैदिक संस्कृत महाविद्यालय या परिसरातच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.शंभर वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी बांधलेले दुर्गादेवी हिलस्टेशन सध्या नव्या दिमाखात उभे आहे. रामलिंग हे येथील रमणीय व मनमोहक वातावरणामुळे ‘मिनी महाबळेश्‍वर’ म्हणूनही ओळखले जात आहे.