Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Solapur › अक्‍कलकोटमध्ये शिवसृष्टीचे आज लोकार्पण

अक्‍कलकोटमध्ये शिवसृष्टीचे आज लोकार्पण

Published On: May 01 2018 1:18AM | Last Updated: Apr 30 2018 8:33PMअक्‍कलकोट : वार्ताहर

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टीची निर्मिती करण्यात आली असून आज 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांनी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्याकडे अन्नछत्र मंडळात शिवस्मारक (गड-किल्लेसृष्टी) निर्माण करण्याबाबत इच्छा व्यक्‍त केली होती. त्यानुसार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे शिल्पकार विवेक खटावकर यांनी त्यांच्या शिल्पकलेतून ही संकल्पना साकारली आहे. श्रीमंत विजयसिंहराजे  प्रतिष्ठानच्यावतीने लोकार्पण सोहळा मंगळवारी सायंकाळी 6.5 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोल भोसले, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर आणि सर्व विश्‍वस्तांची उपस्थिती राहणार आहे. या शिवसृष्टीत महाराजांच्या जीवनातले महत्त्वाचे गड व किल्ले यांचे आकर्षक भित्तीशिल्प उभारण्यात आले आहे.

त्यात शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला याचबरोबर रायगड, तोरणा, पुरंदर, सिंधूदुर्ग, प्रतापगड, राजगड, रायगड, वेल्लोरी आणि शेवटचा गोव्यातला अग्वाद जो पोर्तुगीजांच्या ताब्यातून घेतलेला भुईकोट किल्ला यांचा समावेश केला गेला आहे. ज्यातून महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे किल्ले ज्याने जनतेला प्रेरणा मिळेल अशा गोष्टी यात समाविष्ट आहेत. या शिवसृष्टीत कोल्हापूरच्या चौगुले यांनी बनविलेला शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा आणि मावळे आदी बसविण्यात आला आहेत. या शिवसृष्टीसमोर संगीतमय कारंजे निर्माण करण्यात आले आहे आणि 50 खांबे ज्यात खास विद्युत कंदील बसवून पथदिव्यांचा मार्ग निर्माण करण्यात आला आहे ज्यातून शिवसृष्टी पाहण्यासाठी जाता येणार आहे. त्याचप्रमाणे तेथे दोन्ही बाजूंना दोन आकर्षक तोफाही बसविण्यात आल्या आहेत. या शिल्पाच्या निर्मितीत मधुकर जिनगरे आणि रोहित गोळे पुणे यांची मोलाची कला यात अंतर्भूत आहे. एकंदरीत ही शिवसृष्टी अन्नछत्राच्या पर्यायाने अक्‍कलकोट पर्यटनात सौंदर्य निर्माण करणारी ठरणार आहे.

Tags : solapur, Akkalkot, Shivsurthi Creation,