Fri, Jul 19, 2019 01:00होमपेज › Solapur › बार्शीचे शिवभक्‍त गुडे परिवार करतो श्रावणात उत्तरेश्‍वराची अनोखी सेवा

बार्शीचे शिवभक्‍त गुडे परिवार करतो श्रावणात उत्तरेश्‍वराची अनोखी सेवा

Published On: Aug 28 2018 1:46AM | Last Updated: Aug 28 2018 1:46AMबार्शी : गणेश गोडसे 

बार्शीच्या प्राचीन व प्रसिद्ध असलेल्या उत्तरेश्‍वर शिवमंदिरात शिवभक्त गुडे परिवाराच्यावतीने मागील चौदा वर्षांपासून श्रावण महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी उत्तरेश्‍वराच्या पिंडीसह मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्याबरोबर रंगबेरंगी रांगोळ्या रेखाटून महादेवाची अनोखी सेवा करण्यात येत आहे. ही आरास व आकर्षकरित्या रेखाटलेल्या रांगोळ्यातील चित्र दर्शन पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी करतात. 

बार्शीतील जुन्या पिढीतील शिवभक्त कै. महादेवअप्पा गुडे हे उत्तरेश्‍वराचे निस्सीम भक्त होते. त्यांची प्रेरणा घेत गुडे परिवारातील चंद्रकांत गुडे यांचे पुत्र महेश व मिलिंद गुडे यांनी सन 2005 म्हणजेच चौदा वर्षांपूर्वी शहरातील मंगळवार पेठेत असलेल्या प्राचीन उत्तरेश्‍वराच्या मंदिरात फुलांची आरास व रांगोळी प्रदर्शनाची सुरुवात केली. खास पुण्याहून फुले मागवून ही आरास बार्शीतील धनंजय डेकोरेटर्स व पुण्यातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मदतीने उत्तरेश्‍वर मंदिरातील महादेवाची पिंड, संपूर्ण गाभारा, मंदिरातील सभा मंडप व मंदिराच्या चोहोबाजूने सुमारे 400 ते 500 किलो रंगबेरंगी व सुगंधी फुलांची नयनरम्य व आकर्षक आरास केली जाते. 

यात लिली, शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, निशीगंध, गलांडा, मोगरा आदी फुलांचा समावेश असतो.  सभा मंडपातील काचेच्या झुंबरात व फुलांच्या आरासवर आकर्षक प्रकाश योजना करण्यात येत असल्याने सायंकाळी फुलांचा आरास अधिक खुलून दिसतो.  दरवर्षी नवीन संकल्पना, यंदा गाय-वासरू ठरले आकर्षण, दरवर्षी फुलांच्या आरासाची नवीन संकल्पना असते. यावर्षी फुलांच्या माध्यमातून बनवलेले गाय-वासरु भाविकांचे आकर्षण ठरले. फुलांच्या आरासाबरोबर आकर्षक रांगोळ्यातून महादेवाच्या पिंडीसह विविध आकर्षक चित्र रेखाटले जातात. ते पाहण्यासाठी महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने येतात. हा आरास किमान दोन दिवस भाविकांसाठी खुला ठेवला जातो. 

गुडे परिवार धार्मिक व श्रद्धाळू 
बार्शीतील गुडे परिवार हा धार्मिक व श्रद्धाळू असून मंदिर स्थापना व देव- देवतांची सेवा ही परंपरा त्यांच्याकडून अनेक वर्षांपासून जपली जात आहे. जगन्नाथ गुडे यांनी सुभाषनगर परिसरात दत्त मंदिर स्वखर्चातून उभारले आहे. विनोद गुडे हे सद्यस्थितीत या मंदिरातील पूजा अर्चा व सेवा पाहतात.