Thu, Jul 18, 2019 16:41होमपेज › Solapur › शिवसेनेची मदार आयात उमेदवारावर

शिवसेनेची मदार आयात उमेदवारावर

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 9:11PMपंढरपूर: प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात अद्याप तरी सक्षम उमेदवार दिसत नाही. त्यामुळे ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारास घेऊन सेनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार असल्याचे दिसते. लोकसभेच्या अनुषंगाने शिवसेनेच्या तंबूत अद्यापही सामसूम असल्याचे चित्र आहे. 

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मित्र पक्ष आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची आघाडी गेल्या तीन दशकाहून अधिक काळ चालत आलेली आहे. 2014 च्या लोकसभा एकत्रित लढलेले हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढले. त्याचा फटका जिल्ह्यात दोन्ही पक्षांनाही बसला असून शिवसेनेला जेमतेम 1 जागा मिळाली तर भाजपलाही फक्‍त 2 जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी झाले तरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत या दोन्ही पक्षांची आघाडी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातही केंद्र आणि राज्याप्रमाणे भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरूच आहे. 

नुकतेच शिवसेनेच्या नेतृत्वाने आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेला जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर उमेदवार द्यावे लागणार आहेत. त्याअनुषंगाने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सेनेकडे आज तरी सक्षम उमेदवार दिसत नाही. 

सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटणीला गेले आहेत. त्यामुळे सोलापूर आणि पूर्वाश्रमीच्या पंढरपूर( आताच्या माढा) लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने कधीही पक्षचिन्हावर स्वतंत्र उमेदवार दिलेला नाही. 

विधानसभेला युती करून आणि लोकसभेला भाजपला सहकार्य अशी आजवरची शिवसेना व भाजपची परंपरा राहिलेली आहे. मात्र आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांमधील युती संपुष्टात आली तर शिवसेनेला सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार द्यावा लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये शिवसेनेकडे सक्षम उमेदवार दिसत नाही. भारतीय जनता पक्षाकडे मात्र विद्यमान खा. अ‍ॅड. शरद बनसोडे, राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे, माजी मंत्री प्रा. लक्ष्णमराव ढोबळे यांची नावे चर्चेत आहे. तसेच या तीन्ही नेत्यांनी पुन्हा मतदारांशी संपर्क सुरू केलेला आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाने तर उमेदवार निश्‍चित करून निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. लोकसभा निवडणुका जेमतेम 1 वर्षाच्या आत होणार आहेत त्यामुळे काँग्रेस, भारतीय जनता पक्ष त्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहे. परंतू शिवसेनेची अद्यापही म्हणावी तशी तयारी सुरू असल्याचे दिसत नाही.  शिवसेनेला सोलापूर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच धनुष्य बाण हे चिन्ह घेऊन लोकांसमोर जावे लागणार असून सेनेचा प्रभाव या मतदारसंघात मोहोळ, उत्तर सोलपूर, दक्षिण सोलापूर आणि काही प्रमाणात  सोलापूर शहरापूरता मर्यादीत आहे. बाकी मुख्य लढत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच होण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेनेला सक्षम उमेदवार तरी मिळणार का हा प्रश्‍न आहे. 

शिवसेनेला जरी उमेदवार मिळाला तरी होणार्‍या मतविभागणीचा लाभ काँग्रेस उमेदवारास होणार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटातही चिंता व्यक्त होत आहे. मात्र निवडणूक लढण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेच्या तंबूत अद्यापही सामसूम असून ऐनवेळी आयात उमेदवार देऊन निवडणूक लढवावी लागणार असल्याचे दिसते.