Tue, Apr 23, 2019 14:09होमपेज › Solapur › निसर्गरम्य परिसरातील शंकरनगरचे शिवपार्वती मंदिर

निसर्गरम्य परिसरातील शंकरनगरचे शिवपार्वती मंदिर

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:21PMअकलूज : रवि शिरढोणे

 शंकरनगर येथील शिव-पार्वती मंदिर हे  भाविकांचे श्रद्धास्थान असून निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांचे आवडीचे स्थळही आहे. पांढर्‍या शुभ्र संगमरवरी  पिंडीवर(शाळुंकेवर) शिव पार्वतीची अर्ध मूर्ती असणारे हे एकमेव मंदिर असल्याने श्रावणात असंख्य   भाविक मंदिराला भेट देतात. 

 स्वातंत्र्यानंतर सन 1956 च्या  काळात शंकरनगरच्या माळरानावर शिवकालीन मंदिर म्हणून उंच टेकडीवर एक छोटेसे मंदिर असल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात.  सहकार महर्षी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर (स्व.) सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1970 च्या दशकात  या मंदिराचे नूतनीकरण केले.  मंदिरातील जुन्या  पिंडीच्या जागी शिव-पार्वतीची नवीन मनमोहक संगमरवरी पाढरी शुभ्र जयपुरी पद्धतीच्या  मूर्तीची 24 फेब्रुवारी 1975 रोजी स्व.रत्नप्रभादेवी यांचेसह अभिषेक करून प्रतिष्ठापना केली.   

जुन्या टेकडीचा पूर्ण कायापालट करून येथे अत्यंत देखणे, भव्य गाभार्‍याचे मंदिर उभारण्यात आले.कालांतराने खा. विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह  मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा  निसर्गरम्य परिसर तयार करण्यात आला. अत्यंत सुंदर बगीचा व मोठ्या वृक्षांनी परिसर हिरवागार बनला आहे. मंदिरात दररोज पूजाअर्चा होते. या मंदिराच्या परिसरात खंडोबा मंदिर, महादेव मंदिर व दत्त मंदिरही आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर  नगारखाना युक्‍त भव्य महाद्वार व  वर चढून जायला दोन्ही बाजूनी पायर्‍या बनविल्या  आहेत.  पायर्‍या चढून वर गेले की शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा आहे.

खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून निधी दिल्याने येथील सोयी सुविधात भर पडली आहे. मंदिराचा अष्टकोनी गाभारा असून अंर्तगत प्रदक्षिणा मार्ग आहे तर अर्धवर्तुळाकार छताचा प्रशस्त सभामंडप असून शिवभक्‍तांना पूजा विधी, जप तप करण्यासाठी शांत वातावरण आहे. मंदिराच्या गाभार्‍यात मूर्तीच्या वर छताला सुंदर अष्टभुजा नागाचे लाकडी शिल्प आहे. तर गाभार्‍याचे दार व प्रदक्षिणा मार्गाच्या छतालाही लाकडी नक्षिकाम केले आहे. मंदिराच्या पायथ्याला   पाण्याच्या तुषारावर चालणारा राज्यातील एकमेव लेसर शो येथे आहे. त्यामुळे शिवभक्‍तांसह पर्यटकांचीही नेहमीच येथे वर्दळ असते. येथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात  येते. या मंदिरात नेहमी दर्शनासाठी गर्दी असते.  श्रावण महिन्यात दर सोमवारी महारुद्र अभिषेक करण्यात येतो.