Wed, Apr 24, 2019 21:52होमपेज › Solapur › लिंगायत स्वतंत्र धर्माला विरोध ..ही तर शिवा संघटनेची स्टंटबाजी

लिंगायत स्वतंत्र धर्माला विरोध ..ही तर शिवा संघटनेची स्टंटबाजी

Published On: May 30 2018 11:11PM | Last Updated: May 30 2018 11:04PMसोलापूर : प्रशांत माने 

लिंगायत समाजाच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनुसार लिंगायत स्वतंत्र धर्माला मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या मागणीसाठी लिंगायत समाजाच्या वतीने रविवार, 3 जून रोजी सोलापुरात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी दिली. तर शिवा संघटनेचा विरोध म्हणजे स्टंटबाजी असून प्रा. मनोहर धोंडे आता दुटप्पी भूमिका घेत असल्याचाही आरोप हत्तुरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केला.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, ही मागणी नवीन नसून जुनीच असल्याचे सांगताना महामोर्चाचे जिल्हा समन्वयक हत्तुरे म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यापासूनच वीरशैव हा धर्म म्हणून मागणी होती. त्यावेळी ख्रिश्‍चन, जैन, लिंगायत अशी स्वतंत्र नोंद आहे; परंतु नंतर ही मान्यता काढून घेण्यात आली होती. शिख समाजात शीख आणि खालसा, तर जैन समाजात दिगंबर आणि श्‍वेतांबर यामध्ये काही काळ वाद झाल्यानंतर कालांतराने शीख व जैन समाजाला मान्यता मिळाली, मग लिंगायत धर्मालाच मान्यता का मिळाली नाही. इंग्रजांच्या  गॅझेटमध्ये आणि देशाच्या राज्यघटनेमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्माला मान्यता आहे.

देश स्वतंत्र झाल्यापासून लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी आहे. वारंवार मागणीनंतरही मान्यता न मिळाल्याने लिंगायत समाजात नाराजीचा सूर आहे. कर्नाटक सरकारने या मागणीसंदर्भात कमिटी नियुक्‍त करुन लिंगायत धर्माला घटनात्मक मान्यता दिली आणि केंद्र सरकारकडे शिफारसदेखील केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने लिंगायत धर्माला मान्यता देऊन केंद्र सरकारकडे शिफारस करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील नांदेड, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, नाशिक, लातूर आदी शहरांतून महामोर्चे निघालेले आहेत. येत्या रविवारी सकाळी 10 वाजता सोलापुरातील महात्मा बसवेश्‍वरांच्या पुतळ्यास अभिवादन करून महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे हत्तुरे यांनी सांगितले.

103 वर्षांच्या शिवाचार्यांकडे नेतृत्व

सोलापुरात होणार्‍या महामोर्चाचे नेतृत्व  103 वर्षांचे शिवलिंग शिवाचार्य अहमदपूर महास्वामी करणार असून धारवाडच्या जगद‍्गुरू मासेमहादेवी, कुडलसंगमचे बसवमृत्यूंजय महास्वामी पंचमसाली, भालकीचे बसवपट्ट देवरु महास्वामी यांच्यासह लाखो समाजबांधव या महामोर्चात सहभागी होणार आहेत. लिंगायत समाजाच्या मागणीस सर्व समाजांचा आणि राजकीय व्यक्‍तींचा पाठिंबा आहे. कारण लिंगायत समाजाला कोणाच्याही आरक्षणात वाटा नको, तर राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा आणि लिंगायत धर्माला मान्यता मिळावी, अशा प्रमुख दोनच मागण्या आहेत. लिंगायत समाजातील पोटजातींना सध्या मिळणार्‍या सवलती कायमस्वरुपी मिळणारच असल्याचेही हत्तुरे यांनी सांगितले.

शिवा संघटनेची स्टंटबाजी

लिंगायत स्वतंत्र धर्मासाठी सोलापुरात निघणार्‍या महामोर्चाला शिवा संघटनेचा विरोध म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिवा संघटनेचे प्रा. मनोहर धोंडे यांनी वीरशैव ही संस्कृती आणि लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याची मागणी केली होती. आता मात्र शिवा संघटना वीरशैव स्वतंत्र धर्म असल्याचे सांगून दुटप्पी भूमिका घेत असल्याचाही आरोप हत्तुरे यांनी शिवा संघटनेवर केला आहे.
 
हत्तुरे कोण ओळखत नाही : प्रा. धोंडे
विजयकुमार हत्तुरे हे कोण आहेत, हे मी ओळखत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. परंतु नुकतेच सोलापुरातील पत्रकार परिषदेत आपण स्पष्ट केले की, लिंगायत धर्म मान्यतेला आपला तीव्र विरोध आहे. लिंगायत व वीरशैव हे समानअर्थी शब्द असून ते वेगवेगळे असूच शकत नाहीत. महामोर्चे म्हणजे तमाम वीरशैव समाजाची दिशाभूल करणार आहेत. कर्नाटकतील समाजाने नुकताच निवडणुकीत विरोध दाखवून दिला असल्याने आता कोणी ढवळाढवळ करू नये.