Tue, Jul 23, 2019 19:30
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाला शिवसेना देणार आव्हान

निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाला शिवसेना देणार आव्हान

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी 

महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक रद्द करून ती नव्याने घेण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या मुद्द्याच्या निमित्ताने मनपातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे दिसून आले. 

महापालिकेत शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, बसप, माकप हे अन्य विरोधी पक्ष आहेत. गेल्या वर्षभरात विरोधकांमध्ये अभावानेच एकी दिसून आली. एरव्ही सत्ताधारी भाजपला अनुकूल वागणारी शिवसेना स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात गेेली आहे, तर भाजपच्या कधी विरोधात तर बाजूने राहण्याची भूमिका घेणार्‍या काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, बसप, माकपने चक्‍क शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेवर कडाडून टीका करणारे हे विरोधी पक्ष स्थायी समिती सभापतीपदाच्या विषयावरुन एकत्र येत शिवसेनेशी सलगी केली आहे. यामुळे विरोधकांनी मोट बांधल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भारुड यांनी शनिवारी फेरनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हा निर्णय अमान्य करताना सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले, हा निर्णय प्रशासनाने दबावाखाली घेतल्याचे दिसून येते. दोन मंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन हा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. शिवसेना या निर्णयाला आव्हान देणार आहे. शिवसेनेचे सभापतीपदाचे उमेदवार गणेश वानकर  म्हणाले, मनपासंदर्भातील समितीची एकदा निवडणूक जाहीर केल्यावर ती रद्द करता येत नाही, असा नियम आहे. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाला आम्ही हरकत घेतली आहे. योग्य ठिकाणी दाद मागणार आहोत.

काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे म्हणाले,  आजचा दिवस हा ‘काळा दिवस’ म्हणावा लागेल. भाजपच्या उमेदवाराला अनुमोदक मिळाला नाही, ही सत्ताधार्‍यांची नामुष्कीच म्हणावी लागेल. फेरनिवडणुकीच्या निर्णयाला आम्ही दाद मागणार व शेवटी आमचाच विजय नक्की आहे. बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे म्हणाले,  दोन मंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन नव्याने निवडणूक घेण्यासाठी दबाव आणला. याचा आम्ही निषेध करीत आहोत. राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव म्हणाले, लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. एमआयएमचे गटनेते तौफिक शेख यांनीही यावेळी आपला निषेध नोंदविला.