Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Solapur › 100 टक्के मुल शिकलं जी... शाब्बास गुरुजी(Video)

मुल शिकलं जी... शाब्बास गुरुजी(Video)

Published On: May 25 2018 5:42PM | Last Updated: May 25 2018 6:06PMमाढा : मदन चवरे

राज्य सरकारने १ ते १० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळा वर्ग वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. अनेक ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांच्या भेटी घेवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी विनवणी करत आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये काय सुविधा असतात हे पालकांना पटवून देताना शिक्षकाचा जीव मेटाकुटीला येत आहे. ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे वाढलेले आकर्षण हे यासाठी प्रमुख कारण आहे. मराठी माध्यमाची सरकारी प्राथमिक शाळा म्हणलं की पालक  त्यातही खास करुन महिला पालक नाक मुरडताना दिसून येत आहेत. या परिस्थितीत तोंड देत पालकांची समजुत  काढून त्यांना मराठी शाळेकडे आकृष्ट करण्यासाठी सरकारी शाळेत काय आहे याची जाहिरातबाजी करणे आवश्यक असल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी सैराट झालं जी या गाण्याच्या तालावर सरकारी शाळेत  मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख केला आहे. सैराट झालं जी या गाण्याच्या चालीवर असलेले " शाब्बास गुरुजी " या  गीताने  सध्या सोशल मीडियावर  धुमाकूळ घातला आहे. याद्वारे आता प्राथमिक शिक्षकांची पट टिकवण्यासाठीची ही सैराट कृती मात्र ग्रामीण पालकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.

शाब्बास गुरुजी या गाण्यातून शंभर टक्के शिकेल मुल, राहणार नाही अडचण, आता वाचायला आणि लिहायला गणितबी सोडवायला जमलं जी... शाब्बास गुरुजी अशी आपुलकीची साद घालण्यात आली आहे. यातच पुढे मराठीतून शिक्षण, दुपारी मोफत जेवण, मोफत गणवेशही मिळणार, नाचून गाऊन शिकवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.  तसेच शैक्षणिक  साहित्यातून मिळते ज्ञान, कृतीतून मिळतोय स्वाभिमान, संगणकासह इंग्रजीही शिकवणार असे म्हणत लोकसहभागातून सुंदर होतीय शाळा नवीन गाव उभा राहतंय  असे म्हटले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवू,  मुलांना मराठी शाळेतच धाडू अशी आर्जव करत माय मराठीला आणि आपल्या शाळेला आपणच जपायचं जी असं म्हणत या गाण्याचा शेवट करण्यात आला आहे.

सध्या " शाब्बास गुरुजी" हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गाण्याची चाल, त्याच्या माध्यमातून सरकारी शाळेत दिले जाणारे शिक्षण व सुविधांचा केलेला उहापोह याला आता पालकवर्ग साथ देणार की खाजगी इंग्रजी शाळांकडे त्यांचा ओढा राहणार हे जून अखेरपर्यंत समजेल. पण काही वर्षापूर्वी निरनिराळ्या कारणांनी सैराट झालेले गुरुजी मात्र अलीकडच्या काही वर्षांत इंग्रजी शाळाच्या धसक्याने शाब्बास गुरुजी झाले आहेत हे नक्की.