Fri, May 24, 2019 03:04होमपेज › Solapur › जेरबंद आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

जेरबंद आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:50PMसोलापूर :प्रतिनिधी 

नवी पेठेतील मोबाईल गल्लीत झालेल्या सत्यवान ऊर्फ आबा कांबळे या युवकाच्या निर्घृण खुनातील सातही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांना सोमवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. मोहिते न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने या सर्वांना 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. खुनानंतर फरार झालेल्या विनित कोणारे या आरोपीलादेखील पोलिसांनी सापळा रचून सोलापुरातच जेरबंद केले आहे. दरम्यान, सोमवारीदेखील नवी पेठेत तणाव कायम होता. पोलिस बंदोबस्तही कडेकोट ठेवण्यात आला होता.

या खुनातील मुख्य आरोपी  सुरेश अभिमन्यू शिंदे उर्फ गामा पैलवान (वय 68, रा. पाणी वेस तालीम), गणेश उर्फ अभिजित चंद्रशेखर शिंदे (वय 25, मुरारजी पेठ, निराळे वस्ती), रविराज दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ), प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (वय 30, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ), तौसिफ गुरूलाल विजापुरे (वय 27, रा. मेहताबनगर, शेळगी), निलेश प्रकाश महामुनी (वय 35), विनित कोणारे (रा. पुणे) असे कोठडी सुनावलेल्या सात आरोपींची नावे आहेत. यातील सहा आरोपींना रविवारीच अक्कलकोट बसस्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर विनित कोणारे याला सोमवारी पोलिसांनी सोलापुरातूनच अटक केली. तो खुनानंतर पुण्याला पळून गेला होता. 

जेरबंद केलेल्या सर्व आरोपींना सुरुवातीला फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एकत्रित आणून पुढे न्यायालयात नेण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासूनच न्यायालयात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. सव्वातीन-साडेतीन वाजता आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी पत्रा तालीमच्या कार्यकर्त्यांसह इतर लोकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. परिणामी काही काळ न्यायायालतही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
खुनाचा हेतू काय आणि इतर हत्यारे शोधण्याकरिता आरोपींची दहा दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांनी मागितली. यावर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेत खुनाचा हेतू हा पोलिसांनीच शोधून काढला आहे. आरोपी संशयित असून त्यांनी खून केलेलाच नाही. ज्यांनी कोणी खून केला त्यांनी जागेवरच हत्यारे टाकून पळ काढला होता. त्यामुळे हत्यारे शोधण्याचा विषयच येत नाही. 2004 साली झालेल्या ऋतुराज खूनखटल्याशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचा संबंध लावून त्यांना नाहक या प्रकरणात गोवण्याचा प्रकार असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. तर त्याला सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदविला. आरोपींना पोलिस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयास पटवून देण्यात आल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सर्व आरोपींना 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या सुनावणीत सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुवर्णा चव्हाण, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.