Tue, Jun 25, 2019 13:17होमपेज › Solapur › एफआरपीसाठी 20 सप्टेंबरची डेडलाईन!

एफआरपीसाठी 20 सप्टेंबरची डेडलाईन!

Published On: Sep 11 2018 11:02PM | Last Updated: Sep 11 2018 10:02PMसोलापूर ः प्रतिनिधी

राज्यातील साखर कारखान्यांकडे थकीत असलेल्या एफआरपीची रक्‍कम शेतकर्‍यांना येत्या 20 सप्टेंबरपर्यंत देण्यात यावी, अन्यथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्व. वसंतराव आपटे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी फडकुले सभागृह येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी खा. शेट्टी बोलत होते. राज्यातील 41 साखर कारखान्यांकडे जवळपास 437 कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. यामध्ये सर्वाधिक कारखानदार हे सोलापूर जिल्ह्यातले असून जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांकडे 129 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यावरून शेतकरी संघटनांसह काही राजकीय पक्षांनीही एफआरपी तत्काळ द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र, शासनाकडून ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे. आता शेतकरी संघटेनेची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे येत्या 20 सप्टेंबरपर्यंत जर शासनाने एफआरपीचे पैसे दिले नाहीत तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नरडीवर बसून पैसे घेऊ, अशा शब्दांत खा. शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

यावेळी वस्त्रोद्याग महामंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर यांनी भाजपवर सडकून टीका करत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशहा होण्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यामुळे लोकशाही अडचणीत सापडली असून शेतकर्‍यांनी आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या न्यायहक्‍कांसाठी संघटनेत काम करण्याची गरज असल्याचे तुपकर यांनी सांगितले. यावेळी जनहित शेतकरी संघटनेतील काही कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला तसेच वसंतराव आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. आदर्श कार्यकर्ता म्हणून वसंत गायकवाड यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब शेळके, सिद्राम अबदुलपुरकर, शिवानंद दरेकर, वसंतराव पाटील, अमोल हिप्परगी, समाधान  फाटे आदी उपस्थित होते.