Sun, May 26, 2019 15:40होमपेज › Solapur › कास्टिंग काऊच होतेय, कटुसत्य आहे 

कास्टिंग काऊच होतेय, कटुसत्य आहे 

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:51PMसोलापूर : प्रतिनिधी

चंदेरी दुनियेत कास्टिंग काऊच होतेय, हे खरे असून ते एक कटुसत्य असल्याची कबुली देत तीन दशकांपासून चंदेरी दुनिया गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद हे एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधला.  रझा मुराद म्हणाले, कोणाच्या  मजबुरीचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे.  ही गोष्ट कधी लपून राहात नाही. कधीना कधी बाहेर पडत असते. त्यामुळे कास्टिंग काऊचचा वापर करुन जे मोठे होण्याचा प्रयत्न करतात त्यांचे यश जादा काळ टिकून राहात नाही.  ऑफर करणार जितका यात दोषी तितकाच बळी पडणाराही दोषी असतो. कास्टिंग काऊचला प्रखरतेने विरोध करण्याची गरज आहे. 

पूर्वी अभिनेता आपल्या इमेजला खूप जपत असे. त्यामुळेच ते  खलनायकाची भूमिका करत नव्हते. मात्र आज याच्या उलट आहे. प्रभावी खलनायकच नसल्यामुळे नायकच खलनायकाचे काम करीत असून त्याला उलट नायकापेक्षा खलनायकात अधिक प्रसिद्धी आणि पैसा मिळत आहे. त्यामुळे आता अभिनेता, अभिनेत्री आपल्या इमेजचा विचार न करता खलनायकाची भूमिका करीत आहेत. पूर्वी चित्रपटांमध्ये अभिनेताच निर्णय घेत होता. मात्र आता प्रोड्यूसर, निर्माता पैशाचे आमिष दाखवून त्यांना  भुरळ पाडून काम करण्यास भाग पाडत आहेत. 

आता चंदेरी दुनियेत पैशाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच गायक, संगीतकार, लेखकांची कमतरता जाणवू लागली आहे. याचा परिणाम आता पूर्वीच्या चित्रपटांसारखे संवाद, गाणे जादा काळ लोकांच्या लक्षात राहात नाहीत. पूर्वी कलेला महत्त्व होते म्हणून ते गाणे, संवाद, हिरो लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत.    

पूर्वी मनापासून, हृदयाला हात घालून चित्रपट निर्माण होत होते. आता त्यात बदल होऊन डोक्याचा वापर करुन, पैशाचा विचार करुन चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. शिवाय जुन्या चित्रपटाचा सिक्‍वेल, पार्ट 2 असा निघत नव्हते. आता काम करावयाची तयारी नसल्याने गाजलेल्या चित्रपटाचाच सिक्‍वेल, अनेक पार्ट काढले जात असल्याचे मत रझा मुराद यांनी  व्यक्‍त केले.

संविधान विरोधी, धर्मांध लोकांना फटकारा 
आपण राजकारणी नाही; मात्र सामाजिक प्रश्‍नांविषयी बोलावयाचे म्हटले तर खूप परिस्थिती बदललेली आहे. एकमेकांतील अंतर वाढले असून सोशलमीडियातून मोठ्या प्रमाणात एकमेकांवर विष ओकले जात आहे. संविधानविरोधी, धर्मांधाची गरळ ओकली जात आहे. अशांना वेळेच फटकारले पाहिजे, असे मत रझा मुराद यांनी व्यक्‍त केले. 

अभिनेत्यांना राजकारण भावले नाही 
खर्‍या अभिनेत्याला राजकारण भावत नाही. राजकारणात तो रमूच शकत नाही. त्यामुळेच धर्मेंद, अमिताभ बच्चन, गोविंदा, सुनील दत्त हे दिग्गज परत राजकारणात  रमले नाहीत. राजकारणात दिखाऊपणा केला जातो. खरा हिरो दिखाऊपणा करू शकत नसल्याचे सांगत यांचे मी आभार मानतो, असे  मत राजकारण, चंदेरी दुनियाविषयी रझा मुराद यांनी व्यक्‍त केले.