Mon, Nov 19, 2018 17:13होमपेज › Solapur › ऊस बिलासाठी आत्मदहनाचा इशारा

ऊस बिलासाठी आत्मदहनाचा इशारा

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 10:15PMसोलापूर : प्रतिनिधी 

सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याकडे असणारे उसाचे बिल तत्काळ मिळावे यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील राजशेखर मेरू या शेतकर्‍याने येत्या 10 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे कारखान्याला दिला आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांच्या ऊस बिलाचे जवळपास कोट्यवधी रुपये थकीत आहेत. हे पैसे कारखानदारांकडून वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढल्या आहेत, तर एफआरपीचे पैसे वसूल करण्यासाठी जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची मालमत्ता विकून पैसे द्या, असे आदेश साखर आयुक्‍तांनी दिले असतानाच दुसरीकडे सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी आता थकीत बिलासाठी अट्टाहास धरला आहे. काही दिवसांपूर्वी मुस्तीच्या एका शेतकर्‍याने ऊस बिल वेळेवर मिळत नसल्याने आत्महत्या केली होती.

त्या पार्श्‍वभूमीवरच तांदूळवाडी येथील राजशेखर मेरू या शेतकर्‍यानेही आता येत्या 10 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मेरू यांचे सिद्धेश्‍वर साखर कारखान्याकडे ऊस बिल थकीत असून त्यापैकी 3 लाख 48 हजार 600 रुपये येणे बाकी आहे, असे मेरू याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे पैसे मला तत्काळ मिळावे, अशी वारंवार मागणी करूनही कारखाना व्यवस्थापन याकडे लक्ष देत नसल्याने आपण आर्थिक अडचणीत सापडलो असल्याचे मेरू यांनी या निवेदनात म्हटले आहे. कारखान्याने पैसे वेळेवर न दिल्यास आपण आत्मदहन करणार असून त्याला कारखाना व्यवस्थापन जबाबदार राहील असे हे मेरू यांनी निवेदनात म्हटले आहे.