Tue, Jun 18, 2019 21:13होमपेज › Solapur › महापालिका स्थायी सभापती निवड; न्यायालयाच्या आजच्या आदेशाकडे लक्ष

महापालिका स्थायी सभापती निवड; न्यायालयाच्या आजच्या आदेशाकडे लक्ष

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:48PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका स्थायी समिती सभापतीबाबत शिवसेना सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबत न्यायालय काय आदेश देते, याकडे सार्‍या शहराचे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. गुरुवारी या पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्ताधारी भाजपमधील दोन गटांमध्ये नेहमीप्रमाणे वाद पहावयास मिळाला. सहकारमंत्री गटाने बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने पालकमंत्री गटाची गोची झाली होती. सहकारमंत्री गटाचे सुभाष शेजवाल यांचा अर्ज भरण्यावर पालकमंत्री गटाने आक्षेप घेतला होता. यादरम्यान एका व्यक्तीने हा अर्ज पळविला. तद्नंतर दोन्ही गटांत समेट होऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरतानादेखील दोनपैकी एक अर्ज पळविण्यात आला. अर्ज भरण्याची मुदत संपल्याचे कारण सांगत शिवसेनेने भाजपला अर्ज भरण्यापासून रोखल्याने मोठा गोंधळ झाला होता. याबाबत भाजपने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यावर विभागीय आयुक्तांनी ही निवडणूक प्रक्रियाच शनिवारी रद्दबातल केली. दरम्यान, गुरुवारीच शिवसेनेने आपला विजय झाल्याचे स्वयंघोषणा केली होती. 

शनिवारी निवडणूक प्रक्रिया रद्द करून नवा कार्यक्रम जारी केल्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. याबाबत शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
 याबाबत माहिती देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान उच्च न्यायालयात देता येते. त्यामुळे शिवसेना सोमवारी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. एकदा जाहीर केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करता येत नाही, असा नियम आहे. हे लक्षात घेता उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागणार आहे, असा आम्हाला विश्‍वास आहे.

नव्या कार्यक्रमानुसार मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यात येणार आहे, तर बुधवारी निवडणूक होणार आहे. दरम्यान, सोमवारी उच्च न्यायालयाने जर नवीन निवडणूक कार्यक्रमाला तूर्त स्थगिती दिली, तर नवीन निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडू शकते. एकंदर न्यायालयाच्या आदेशावरच निवडणूक होणे वा न होणे अवलंबून आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाने सभापतीपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते.