Thu, Apr 25, 2019 13:50होमपेज › Solapur › सोलापूर : मनपातील एक निवड अधिकृत, तर दुसरी अनधिकृत

सोलापूर : मनपातील एक निवड अधिकृत, तर दुसरी अनधिकृत

Published On: Mar 02 2018 8:38AM | Last Updated: Mar 02 2018 8:38AMसोलापूर : प्रतिनिधी 

भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडून महापालिका बदनाम झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर मनपात काहीही घडू शकते, याचा प्रत्यय वारंवार येत आहे. गुरुवारी झालेल्या दोन निवडीपैकी एक अधिकृत, तर दुसरी अनधिकृत अशी म्हणावी लागेल.

गुरुवारी स्थायी समितीच्या सभापतीपदावरुन भाजपमध्ये ‘राडा’ झाला. या पदावरुन भाजपची अब्रु पुन:श्‍च एकदा वेशीवर टांगली गेली. उमेदवारी अर्जावर अनुमोदक नसल्याने भाजपच्या उमेदवाराला सुमारे तीन तास  प्रतीक्षा करावी लागली. दरम्यानच्या काळात शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी मनपा सभागृहनेतेपदी संजय कोळी यांची पक्षाने नियुक्ती केल्याचे घोषित केले. यावेळी निंबर्गी व तिथे उपस्थित महापौर शोभा बनशेट्टी यांनी सत्कार केल्यावर कोळी यांनी पदभारही स्वीकारला. यानंतर भाजपच्या गोटात नाट्यमय घडामोडी झाल्या. 

सभागृहनेता तसेच स्थायी समिती सभापती हे दोन्ही गट पालकमंत्री गटाच्या वाट्याला गेल्याने अस्वस्थ झालेल्या सहकारमंत्री गटाने सभापतीपदाचा अर्ज भरण्यासंदर्भात असहकाराचे धोरण अवलंबिले. या वादात सभापतीपद जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी होऊन भाजपच्या उमेदवारीबाबत वाद निर्माण झाला. 

याचाच लाभ उठवत शिवसेनेने आपल्या उमेदवाराची अविरोध निवड झाल्याचा दावा करीत खळबळ उडवून दिली. भाजपच्या अर्जावर अनुमोदकाची सही नाही, त्यामुळे हा अर्ज वैध ठरुन शिवसेनेचे गणेश वानकर अविरोध निवडून आल्यात जमा आहेत, असे जाहीर करीत शिवसेनेने मनपात जल्लोष केला. वानकर यांचा सत्कार करुन फटाक्यांची आतषबाजीही 
केली. 

एकाच दिवशी कोळी व वानकर यांच्या झालेल्या या निवडींबद्दलची दिवसभर मनपाच्या गोटात चर्चा होती. यातील एक अधिकृत, तर दुसरी तूर्त तरी ‘अनधिकृत’ या चर्चेने जोर धरला होता. दरम्यान, सभापतीपदाच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेल्या वादाचा शेवट काय होतो, यावरुन सभापतीपद वानकर यांच्याकडे येणार की नाही, हे ठरणार आहे.