होमपेज › Solapur › खुर्चीसाठी अडले माध्यमिक शिक्षण विभागाचे उद्घाटन

खुर्चीसाठी अडले माध्यमिक शिक्षण विभागाचे उद्घाटन

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:54PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करून या कार्यालयाला कॉर्पोरेटचा लूक देण्यात आला आहे. मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासाठी नवी खुर्ची नसल्याने या कार्यालयाचे उद्घाटन गत कांही दिवसांपासून रखडले गेल्याने अधिकारी पदाधिकारी वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे. 

गतवर्षी जि.प.सेस फंडातील अखर्चित निधी अधिकार्‍यांनी पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने हव्या त्याठिकाणी बांधकाम व दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात आली आहे. या निधीतील जिल्हा परिषदेत अनेक विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमात जरी कांही जणांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले असले तरीही शासकीय कार्यालयांना मात्र नवा लूक आला आहे. माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प. अध्यक्ष यांच्या नियंत्रणाखाली जरी हा विभाग असला तरी जिल्हा परिषद आपले काहीच वाकडे करु शकणार नाही, अशीच भूमिका या विभागाची आतापर्यंत दिसून आली आहे. त्यामुळे या विभागातील अधिकार्‍यांचा उर्मटपणा दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. 

नव्या खुर्चीसाठी तरतूद नाही. आहे, त्या परिस्थितीत उद्घाटन करून टाकू, अशी भूमिका जि.प. पदाधिकार्‍यांनी घेतली होती. मात्र, शिक्षणाधिकार्‍यांचा नव्या खुर्चीसाठी बालहट्ट कायम असल्याने पदाधिकार्‍यांना पुन्हा त्यांच्या खुर्चीसाठी नवी तरतूद करुन घेण्याची वेळ आली आहे. अधिकार्‍यांच्या मनमानीपुढे पदाधिकारीही झुकत असल्याने जिल्हा परिषदेत अधिकारी पदाधिकार्‍यांपेक्षाही वरचढ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावरुन जि.प. सदस्यांत सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. हा विभाग जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना व पदाधिकार्‍यांना जुमानत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तरीही पदाधिकारी व सर्वसाधारण सभा आपले अधिकार दाखवून देत नसल्याबद्दलही आश्‍चर्य निर्माण होत आहे. केवळ एका खुर्चीच्या हट्टासाठी या विभागाचे उद्घाटन आणखीन किती दिवस पुढे जाणार, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कारभाराची हीच का पद्धत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.