Sat, Mar 23, 2019 12:11होमपेज › Solapur › ‘नमामी’ योजनेंतर्गत चंद्रभागा बहरणार फळाफुलांनी  

‘नमामी’ योजनेंतर्गत चंद्रभागा बहरणार फळाफुलांनी  

Published On: Jun 28 2018 1:36AM | Last Updated: Jun 27 2018 8:46PMसोलापूर : महेश पांढरे 

राज्य शासनाच्या ‘नमामी चंद्रभागा’ योजनेंतर्गंत पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूंनी फळझाडे लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांनी नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन या योजनेच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये नदीपात्रावर जवळपास 500 मीटर लांबीचा दगडी घाट बांधण्यात येणार असून तत्पूर्वी 15 मीटरच्या घाटाचे काम पूर्ण झाले आहे. याची तांत्रिकदृष्ट्या तपासण्या करून त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत काय याची पाहणी करुन पुढील घाटाचे काम सुरू करण्यात येणार असून यासाठी जवळपास 22 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहरात पाणीपुरवठ्यासाठी जवळपास 66 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डीपीआर बनविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्य शासनाने शतकोटी वृक्ष लागवडीकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे यंदा चंद्रभागेच्या दोन्ही बाजूंनी फळांची आणि विविध प्रकारच्या फुलांची हजारो झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या वृक्ष लागवडीनंतर काही वर्षांनी चंद्रभागा नदीचे पात्र फळाफुलांनी बहरून निघणार आहे. पंढरपूर परिसरातील साखर कारखान्यांचे सांडपाणी नदीपात्र येणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्या त्या साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. कारखान्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा उपयोगात आणण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रभागेचा परिसर आणि प्रवाह कायम राहण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

स्वाईल बायोटेक्नॉलॉजी वापरुन सांडपाण्याचे व्यवस्थापन

नमामी चंद्रभागा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा डीपीआर बनविण्याचे सुरु आहे. यामध्ये पंढरपूर शहरातून बाहेर पडणार्‍या सांडपाण्यावर स्वाईल बायोटेक्नॉलॉजीचा वापर करुन ते पाणी नैसर्गिकदृष्ट्या शुध्द करुन नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी अशुध्द होणार नाही तसेच त्यामध्ये असणार्‍या जलचर प्राण्यांनाही याचा धोका होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली असून नदीपात्रात कायम पाणी ठेवण्याच्यादृष्टीनेही प्रयत्न चालू असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.