Tue, Jul 23, 2019 11:44होमपेज › Solapur › निर्घृण खुनाने गँगवार भडकण्याची चिन्हे

निर्घृण खुनाने गँगवार भडकण्याची चिन्हे

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 11:09PMसोलापूर ः प्रतिनिधी 

‘खून का बदला खून’ या न्यायाने येथील नवीपेठेलगतच्या मोबाईल गल्लीत शनिवारी रात्री पत्रा तालीम परिसरात राहणार्‍या तरुणाचा हल्लेखोरांनी कोयत्याने सुमारे 60 सपासप वार करून अत्यंत निर्घृण खून केला. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली आणि रात्रीच तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचे पडसाद रविवारीदेखील दिसून आले. दिवसभर नवीपेठ ही मुख्य बाजारपेठ बंद होती. रविवारी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सत्यवान ऊर्फ आबा विष्णू कांबळे (वय 32, रा. उत्तर कसबा) असे मृताचे नाव असून, त्याचा भाचा शुभम श्रीकांत धुळराव याने दिलेल्या फिर्यादीवरून रविराज शिंदे, सुरेश शिंदे ऊर्फ गामा पैलवान व त्यांचे इतर सहा साथीदार अशा आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जीवघेणा पाठलाग करून केले वार 

सत्यवान कांबळे याचे मोबाईल गल्लीत मोबाईल रिपेअरीचे दुकान आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो दुकान बंद करून मित्रांसमवेत मोटारसायकलवरून घरी निघाला होता. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सत्यवानवर हल्ला केला. डोक्यात, कानावर, मानेवर कोयत्याचा वार बसताच जीव वाचवण्यासाठी सत्यवानने पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर गेल्यानंतर पाठलाग करून परत त्यास गाठून सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात सत्यवान काही काळ पडून होता. या प्रकाराने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या सत्यवानने जागीच प्राण सोडला.

वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, दीपाली काळे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, संजय जगताप यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. 

रक्ताने माखलेले चार कोयते जप्त

सत्यवानचा खून केल्यानंतर रक्ताने माखलेले चार कोयते, कोयते आणलेली पिशवी घटनास्थळी टाकून हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी कोयते, पिशवी जप्त केली असून, बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले असून, त्यात हल्लेखोर दिसतात का, याचा कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत सत्यवानच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन बहिणी असा परिवार आहे. 

सत्यवानने खुनाची शिक्षा भोगली होती 

सत्यवान कांबळे हा 2006 मध्ये ऋतुराज शिंदे याच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून 2014 मध्ये परत आला होता. सुटून आल्यापासून रविराज शिंदे हा त्याच्या पाळतीवर होता. अधूनमधून आम्ही राहत असलेल्या घरासमोरुन मोटारसायकलवरुन चकरा मारुन त्यास रागाने बघून इशारे करीत होता. 

महिन्यापूर्वी धमकी देऊन केला खून

एक महिन्यापूर्वी फिर्यादी शुभम व सत्यवान जेवण करून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील कट्ट्यावर बसले असता रविराज शिंदे, सूरज साळुंखे असे दोघे मोटारसायकलवरून त्यांच्या घरासमोरून गेले व परत घरासमोरुन जाता जाता कांबळे यास रविराज शिंदे याने तुला बघून घेतो, तू जास्त दिवस राहणार नाहीस, अशी धमकी दिली होती. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी घरासमोर रात्रीच्यावेळी बसले असता रविराजने मोटारसायकलवरुन येऊन सत्यवान यास हत्यार दाखवून खुन्नस देवून निघून गेला. बदला घेण्यासाठीच कट करून सत्यवान याचा खून केल्याचे फिर्यादी शुभम धुळराव याने आपल्या तक्रारअर्जात नमूद केले आहे.

अक्कलकोट स्थानकातून आरोपी घेतले ताब्यात 

कोयत्याने सपासप वार करून खून करताना सर्व आरोपी सीसीटीव्ही कमेरेत कैद झाले होते. कालच्या हल्ल्यानंतर सर्व आरोपी सात रस्ता येथे एकत्र आले. त्यानंतर तेथून सर्वजण इंडी, विजापूर असा प्रवास करून अक्कलकोट येथे एसटीची वाट पाहत असताना सुरेश अभिमन्यू शिंदे उर्फ गामा पैलवान (वय 68), गणेश चंद्रशेखर शिंदे (29), रविराज शिंदे (28), प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (31), निलेश प्रकाश महामुनी (35), तौसीफ गुडू विजापुरे (27) या सहा संशयितांना ताब्यात घेतले. यातील विनित कोणुरे हा हल्ला करून पुण्याला फरार झाला आहे. सुरेश शिंदे उर्फ गामा पैलवान हे मागील खुनातील ऋतुराज शिंदे याचे वडील असून इतर शिंदे हे ऋतुराज याचे पुतणेभाऊ आहेत. पुण्याचा कोणुरे हा शिंदेंचा दूरचा नातेवाईक तर विजापुरे हा मित्र आहे. 

रायगड ट्रीपअगोदरच काढला काटा 

सत्यवान  कांबळे आणि इतर मित्र मिळून रायगड ट्रीपला जाण्याचा प्लॅन बनवत होते. ट्रीपला जाण्याअगोदरच त्याचा काटा काढण्यात आला. महिन्यापूर्वीच हल्ल्याचा प्लॅन गामा पैलवान उर्फ सुरेश शिंदे यांच्या घरी केला गेला होता. काही कोयते घरात होते, तर काही कोयते मंगळवार बाजारातून आणण्यात आले होते. पंधरा दिवसअगोदर पाळत ठेवण्यात आली होती. पण दोनदा प्लॅन फसला होता. शनिवारी रात्री सत्यवान याला गाठून काटा काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहशतीने नवीपेठ बंद

येथील मोबाईल गल्लीत शनिवारी रात्री गँगवारमधून सत्यवान ऊर्फ आबा कांबळे या युवकाच्या झालेल्या खुनाचे पडसाद रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवीपेठेत उमटले. रविवारी सकाळी काही तरुणांनी दुकाने बंद करण्यासाठी अरेरावी करताच व्यापार्‍यांनी घाबरून पटापट दुकाने बंद केली, पोलिसांनी दुकाने उघडण्याचे आवाहन केल्यानंतरही व्यापार्‍यांनी दुकाने उघडलीच नाहीत. गँगवारच्या भडक्याची दहशत बाजारपेठेवर दिसून आली.

शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नवीपेठ जवळील मोबाईल गल्लीत तरुणाचा निर्घृण खून झाल्याची बातमी सोलापूरात वार्‍यासारखी पसरली. याचे पडसाद आज रविवारी नवीपेठेत दिसून आले,  सकाळी दहापर्यंत नव्या पेठेतील तुरळक दुकाने उघडली होते, त्याच दरम्यान काही तरुणांच्या जमावाने दुकान बंद करण्यासाठी अरेरावी केली.  त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये दहशत पसरल्याने अवघी नवी पेठ बंद झाली. रविवार हा बाजारपेठेतील गर्दीचा दिवस असतानाही दिवसभर छोटी दुकानेच नव्हे तर हातगाड्यांवरील व्यवसाय देखील बंद होता. 

नवी पेठ बंद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी नव्या पेठेत कमांडोंचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली काळे यांनी नव्या पेठेत येऊन व्यापार्‍यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. पोलिस व्हॅनवरील स्पिकरवरून नव्यापेठेत फिरून दुकान उघडा आणि कोणतीही भीती बाळगू नका, असे आवाहन पोलिसांनी केले, तरी देखील व्यापार्‍यांनी दुकाने उघडलीच नाहीत.