होमपेज › Solapur › 16 मेपासून संत तुकडोजी ग्रामस्वच्छता अभियान

16 मेपासून संत तुकडोजी ग्रामस्वच्छता अभियान

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:32PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभियान प्रभावीपणे राबवा. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 10 हजार रुपये बक्षीस, तर प्रत्येक जिल्हा परिषद प्रभागातून स्वच्छ ग्रामपंचायत निवडण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील विस्तार अधिकारी व बीआरसी व सीआरसी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना लोंढे बोलत होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, समाजशास्त्र तज्ज्ञ महादेव शिंदे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी तज्ज्ञ शंकर बंडगर, पर्यावरण तज्ज्ञ मुकूंद आकुडे प्रमुख उपस्थित होते.

1 मे ते 15 मे या कालावधीत पंचायत समिती स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच व तालुकास्तरीय खाते प्रमुख यांची अभियानाची पूर्वतयारी बैठक व अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 16 मे ते 31 मे या कालावधीत गाव स्तरावर समितीचे गठण करून गावाचा स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत उत्कृष्ट प्रभागांची तयारी करण्यात येत आहे. यासाठी 100 मार्क देण्यात येणार आहेत. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत उत्कृष्ट प्रभागाची निवड करण्यात येऊन बक्षीस घोषित करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे  व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे. 

उत्कृष्ट प्रभागासाठी 10 हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत उत्कृष्ट प्रभागातील ग्रामस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व जिल्हा परिषद गटात स्वच्छ ग्राम स्पर्धा होणार आहे. यासाठी याबाबत माहिती देताना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 68 प्रभागांसाठी स्पर्धा होणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात सर्वोच्च गुण प्राप्त करणार्‍या  ग्रामपंचायतीसाठी 50 हजार रुपये बक्षीस आहे. 68 ग्रामपंचायती निवडण्यात येत आहेत. 

यापूर्वी तालुक्यासाठी होणारी स्पर्धा आता प्रत्येक जिल्हा परिषद गटात होणार आहे. 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 68 गटातील 68 ग्रा.पं.मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येणार आहेत.उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील म्हणाल्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती व स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 
राज्यात प्रथम येणार्‍या जिल्हा परिषदेसाठी 1 कोटीचे बक्षीस, द्वितीय - 75 लाख, तृतीयसाठी 50 लाख, तर स्वच्छ पंचायत समिती राज्यात प्रथम - 50 लाख, द्वितीय - 30 लाख, तृतीय 20 लाख रुपये बक्षीस देण्यात येत आहे. 

बक्षिसांची खैरात

उत्कृष्ट प्रभाग- 10 हजार गट स्पर्धा- जिल्हा परिषद गट प्रथम ग्रामपंचायत- 50 हजार, जिल्हा स्तर प्रथम- 5 लाख, द्वितीय- 3 लाख, तृतीय 2 लाख, विभाग स्तर- प्रथम 10 लाख, द्वितीय- 8 लाख, तृतीय- 6 लाख, राज्य स्तर- प्रथम 25 लाख व द्वितीय 20 लाख, तृतीय- 15 लाख.

Tags : Solapur, Sant Tukdoji, Village, Cleanliness, Campaign, May, 16