होमपेज › Solapur › रेल्वेस्थानकावर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन

रेल्वेस्थानकावर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 8:30PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर रेल्वेस्थानकात व गुलबर्गा  रेल्वेस्थानकामध्ये महिलांच्या सोयीसाठी अत्यल्प दरात  सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. फक्‍त पाच रुपयांत महिलांना रेल्वेस्थानकांत सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडल रेल प्रबंधक  हितेंद्र मल्होत्रा व महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी माहिती दिली.

रेल्वे प्रवासात महिलांची सोय व्हावी या उद्देशाने सोलापूर स्थानकावर सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली. महिला विश्रांती कक्षात सॅनिटरी नॅपकिनची व्हेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे. केवळ पाच रुपयांत महिला प्रवाशांना पॅड उपलब्ध होत आहेत. यासोबतच वापरलेले पॅड नष्ट करण्याची मशीनही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्थानक परिसर व रूळ स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. यासोबतच प्लास्टिकच्या बाटल्या नष्ट करणारी मशीन(प्लास्टिक बोटल क्रशिंग मशीन) स्थानकावर बसवण्यात आली आहे. यामुळे परिसर तर स्वच्छ राहीलच शिवाय प्लास्टिक बाटल्या नष्ट केल्याने पर्यावरणाची होणारी हानी टाळली जाणार आहे. 

रोटरी क्लब ऑफ सोलापूरने पी. पी. पटेल फाऊंडेशनच्या सहकार्याने महिला विश्रांती कक्षात सॅनिटरी मशीन बसवले आहे. यात पाच रुपयांचे नाणे किंवा एक रुपयांची पाच नाणी टाकल्यानंतर पॅड मिळणार आहे. सॅनिटरी नॅपकिनच्या मशीनमध्ये 50 पॅड उपलब्ध असणार आहेत तसेच दिव्यांगांसाठी दोन व्हिलचेअर्सही स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आल्याने दिव्यांग प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. 

स्थानक परिसर व रुळांमध्ये अनेक प्रवासी पाणी पिल्यानंतर प्लास्टिक बाटल्या फेकून देतात. पावसाळ्यात या बाटल्यांमुळे ड्रेनेजलाईन बंद होते. ट्रॅकवर पडलेल्या बाटल्यांमुळे परिसरही अस्वच्छ दिसतो. हे टाळण्यासाठी पहिल्यांदाच सोलापूर स्थानकावर बॉटल क्रश मशीन बसवण्यात आले आहे. 

माध्यमांशी बोलताना यावेळी मध्य रेल्वे विभागातील मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, डीआरएम हितेंद्र मल्होत्रा, महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार व ए.के. जैन, रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश चन्ना, डॉ. राजीव प्रधान, अध्यक्ष जयेश पटेल, सचिव प्रशांत सिंगी, राजशेखर येळीकर, ऋत्वीज चव्हाण, संदीप जव्हेरी, सलाम शेख, आदी उपस्थित होते.