Sat, Feb 23, 2019 10:16होमपेज › Solapur › सांगोला पोलिस ठाणे झाले आय.एस.ओ.

सांगोला पोलिस ठाणे झाले आय.एस.ओ.

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 9:47PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला पोलिस ठाण्याने सर्व निकषांची पूर्तता केल्याने आय.एस.ओ. मानांकन मिळाले असून शनिवार, 16 जून रोजी मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते पो.नि. राजकुमार केंद्रे यांना आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

सांगोला पोलिस स्टेशनचे सुसज्ज इमारतीत स्थलांतर झाले आणि पोलिस स्टेशनचा कायापालट झाला. पो.नि. केंद्रे यांनी पोलिस ठाण्याची सुत्रे हाती घेताच दैनंदिन कामकाजात सुसूत्रता व कारभारात पारदर्शकता आणणे त्याचबरोबर  पोलिस स्टेशनला  आय.एस.ओ. मानांकन मिळविण्यासाठी वाटचाल सुरू ठेवली. पो.नि. केंद्रे यांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात विविध जातीचे वृक्षारोपण करून वृक्ष लावगवडीची संकल्पना अंमलात आणली. सभोवताली विद्युत दिवे, महिला-पुरूषांसाठी स्वच्छतागृह त्याचबरोबर सांगोला पोलिस स्टेशनच्या संपूर्ण इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली. 

त्यानंतर अंतर्गत कार्यालयातील कक्षनिहाय गोपनीय, बारनिशी (हजेरी मेजर),  ठाणे अंमलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखा, विशेष तपास पथक, कारकून, बिनतारी संदेश (सीसीटीव्ही कक्ष), दुय्यम अधिकारी, पोलिस निरीक्षक कक्ष व पुरूष, महिला कारागृह अशा विविध विभागाच्या कार्यालयास नामफलक लावले. 

ज्या-त्या विभागाबरोबरच गुन्हे निर्गमित, प्रतिबंध  कारवाई, सराईत गुन्हेगारावरील हद्दपार प्रस्ताव, अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन, गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी अटक अशा सर्व फाईल्स, दप्तर, कागदपत्रे, अद्ययावत करून विभागनिहाय ठेवण्यात आल्या.  सर्व निकष पूर्ण केल्यानंतर आय.एस.ओ.साठी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे  प्रस्ताव दाखल केला होता. सर्व निकष पूर्ण झाल्याने सांगोला पोलिस स्टेशनला आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र दिले आहे.