Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Solapur › संदीप पवार खूनप्रकरणी दोघांना 5 जूनपर्यंत कोठडी

संदीप पवार खूनप्रकरणी दोघांना 5 जूनपर्यंत कोठडी

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:18PMपंढरपूर : प्रतिनिधी

अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेले एकनाथ शिंदे व बबलू शिंदे यांना पुणे विशेष मोका न्यायालयाने 6 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे़ याप्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला गोपाळ अंकुशराव यास यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे़ 

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणामध्ये संशयित आरोपींची संख्या 22 पेक्षा जास्त झाली आहे़ तर या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा आरोप असलेल्या गोपाळ अंकुशरावसह अन्य  29 जणांवर मोका (संघटित गुन्हेगारी) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते़

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे व बबलू शिंदे या दोन आरोपींना गुरुवारी पुणे विशेष मोका न्यायालयात हजर करण्यात आले़ त्यावेळी या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार आहेत़ त्यांचा शोध घ्यावयाचा आहे़  गुन्ह्याचा कट कुठे रचला, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे कोठून आणले़ या खून प्रकरणात कोणाचा सहभाग आहे का, याविषयाचा तपास करणे बाकी असल्याने तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली़   त्यावर विशेष मोक्‍का न्यायालयाचे न्या़ ए़ एस़ महात्मे यांनी दोन्ही आरोपींना  5 जून पर्यंत सहा दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे़  आरोपीतर्फे अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर मोरे, अ‍ॅड. चव्हाण, अ‍ॅड.ठोंबरे यांनी काम पाहिले़

दरम्यान या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा आरोप असलेल्या गोपाळ अंकुशराव यास 28 मे रोजी विशेष मोक्‍का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनावली होती़  त्यामुळे त्यांची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली आहे़