होमपेज › Solapur › संदीप पवार खूनप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

संदीप पवार खूनप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:04PMपंढरपूर : प्रतिनिधी

येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गोपाळ अंकुशराव ऊर्फ सरजीसह इतर  आरोपींना 11 मे रोजी पुणे येथील विशेष मोक्‍का न्यायालयापुढे उभे केले असता, न्यायाधीश महात्मे यांनी त्यांना दि. 19 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनप्रकरणी भाजपचा जि.प. सदस्य आणि सरजी गँगचा प्रमुुख गोपाळ अंकुशराव याला अटक करण्यात आली आहे.

सध्या त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली असून 11 मे रोजी सरजीसह आकाश बुरांडे, रूपेश सुरवसे, सचिन वाघमारे, ओंकार जाधव, प्रथमेश लोंढे, राहुल पगारे, पिराजी लिगाडे, दिगंबर जानराव यांना पुणे येथील  मोक्का न्यायालयात हजर केले असता मोका न्यायाधीश महात्मे यांनी सरजीसह 8 जणांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यात इतर 6 नवीन आरोपींना सामील केल्याने गुन्ह्यातील आरोपींची संख्या 27 वर गेली आहे. दरम्यान आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता आरोपींची साक्षीदारांमार्फत ओळख परेड घ्यायची असल्याने गोपाळ अंकुशराव ऊर्फ सरजी वगळता इतर सर्व आरोपींना बुरखा घालून कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपींच्यावतीने  अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर मोरे, अ‍ॅड.सुधीर शहा यांनी काम पाहिले .