होमपेज › Solapur › तडवळ भागात वाळू तस्करीने डोके वर काढले

तडवळ भागात वाळू तस्करीने डोके वर काढले

Published On: Apr 29 2018 12:32AM | Last Updated: Apr 29 2018 12:08AMअक्कलकोट : शिवाजी याळवार

अक्कलकोट तालुक्यातील वाळू तस्करीविरोधात महसूल विभाग तहसील कार्यालयाकडून मंडल अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ कर्मचार्‍यांचे गठीत केलेले पथक केवळ कागदावरच राहिले आहे. यामुळे तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातील विविध ठिकाणांहून वाळू तस्करी जोरात सुरु असल्याचे चित्र आहे.

तडवळ भागातील शेगाव, धारसंग, देवीकवठे, कुडल, खानापूर, अंकलगे, म्हैसलगे, आळगे, गुड्डेवाडी या भागांतील सीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा गेल्या सहा-सात महिन्यांपासून चालू आहे. याविरोधात तहसीलदार अक्कलकोट यांनी पायबंद घालण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करुनही हा प्रकार थांबत नसल्याचे लक्षात आले. यामुळे अक्कलकोट, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, तडवळ, करजगी, किणी या नऊ मंडल अधिकार्‍यांना आदेश काढून आठवड्याच्या रविवारी, दुधनी मंडल अधिकारी बेलभंडारे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी  एस.आर.चव्हाण, आर.एस. भासगी, जी.यू.जाधव, टी.एन. थोरात, ए.ए. तेरदाळ व त्यांच्यासोबत एक हत्यारी पोलिस नेमला आहे.

वारनिहाय नेमण्यात आलेले कर्मचारी पुढीलप्रमाणे. सोमवार -अक्कलकोटचे एम.के. घोसले यांच्या पथकामध्ये एस.एस. जोडमोटे, व्ही.आर. चोरमुले, एस.डी. सावळे, एस.जी.पुजारी, ए.एच. शिंदे व त्यांच्यासोबत एक हत्यारी पोलिस.

मंगळवार - तडवळ मंडल अधिकारी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एच. शिंदे, आर.एस. बिराजदार, ए.ए. तेरदाळ, एस.एस. जाधव, आर.एस. बिराजदार, आर.एस. वाघमारे व त्यांच्यासोबत एक हत्यारी पोलिस. बुधवार - किणी मंडल अधिकारी, एस.बी. काळे, आर.एस. वाघमारे, आय.के. अत्तार, एस.व्ही. जमदाडे, जी.एच. कदम व एक हत्यारी पोलिस. गुरुवार - जेऊर मंडल अधिकारी एस.सी. जमादार- जी.एस.घाटे, एस.पी. पाटील, एच.पी. पाटील, एस.टी. गोरे व  एक हत्यारी पोलिस. शुक्रवार - चपळगाव मंडल अधिकारी एम.एल. स्वामी - तलाठी बी.एल. शिंदे, एस.डी. राठोड, एन.एस. कोळी, व्ही.एस. पवार, डी.आर. पांढरे व एक हत्यारी पोलिस. शनिवार - करजगी मंडल अधिकारी  जे.जी. जुगदार - तलाठी एस.बी. कोळी, पी.पी. जाधव, बी.पी. कुंभार, एन.के. मुजावर, एस.सी. जगताप, जे.व्ही. फडतरे असे आठवड्यातील सात दिवसांतील प्रत्येक वारासाठी रात्रीच्यावेळी प्रत्येक मंडलातील मंडल अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली वाळूविरोधी कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.  या फिरत्या पथकाची नेमणूक जिल्हाधिकारी सोलापूर व उपविभागीय अधिकारी क्र. 2 यांच्या आदेशान्वये अक्कलकोट तालुक्यातील सीना-भीमा नदीपात्रातील अनधिकृत वाळू वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करण्याकामी करण्यात आली आहे. या आदेशामध्ये नेमलेल्या भरारी पथकांनी अवैध वाळू वाहतुकीबाबत दक्ष राहून कारवाई करण्यात यावी, अशी सूचना त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे.

दंडात्मक कारवाईचे आदेश या पथकांना आढळून येणार्‍या अनधिकृत वाळू वाहनांवर चालक व मालकांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करणे व तसा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे, नेमून दिलेल्या दिवशी व ठिकाणी विनापरवाना गैरहजर राहणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा या पत्रामध्ये देण्यात आला आहे. तरीही यामधील बहुतांशी कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत न राहता दांडी मारत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या महिन्याभरात या पथकाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक चालू असतानाही शून्य कारवाई केली आहे. यामुळे आदेशातील निलंबन करण्याच्या सूचनांचे पालन वरिष्ठ करणार का, असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.  एकूणच अवैध वाळूविरोधी नेमण्यात आलेले पथक प्रत्यक्षात कृती न करता केवळ कागदावर राहिलेले आहेत. यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आजही चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे पोलिसांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी या परिसरातील लोकांतून होत आहे.