Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Solapur › हवेत दांडपट्टा फिरवून वाळू माफियांची पोलिसांसमोर दहशत

हवेत दांडपट्टा फिरवून वाळू माफियांची पोलिसांसमोर दहशत

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 10:57PM तांडोर येथील वाळू साठ्यांवर छापा; 13 जणांवर गुन्हा दाखल
 

सोलापूर : प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रातील बारभाई भागातील अवैध वाळू साठ्यांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे साडेचारच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत 13 जणांविरुद्ध   मंगळवेढा  पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर वाळू माफियांनी हवेत दांडपट्टा फिरवून दहशत निर्माण करून सरकारी कामात अडथळा आणला.

राहुल राजाराम सरवळे (वय 27, रा. बेगमपूर, ता. मोहोळ), समाधान भारत सरवळे (21, रा. बेगमपूर), रवींद्र ऊर्फ पपल्या रामा काळे, सचिन काळे, सुरेश ऊर्फ बिगुल्या रामा काळे, किशोर रामा काळे, अमित शरणप्पा भोसले, शंकू सुरेश काळे, संजय शरणप्पा भोसले, सूरज शरणप्पा भोसले, विक्या भीमसिंग भोसले (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा), शरद जाफर पवार (रा. सिद्धापूर, ता. मंगळवेढा), पृथ्वीराज भोसले (रा. बेगमपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

 पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांना तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रातील बारभाई भागात वाळूचे अवैध साठे केलेले  असून  काही जण ही वाळू ट्रॅक्टर व टेम्पोमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी  विशेष पथकाला याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी राहुल सरवळे व समाधान सरवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे व लायसन्स विचारले. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिस हे त्या दोघांच्या वाहनांवर कारवाई करीत होते. त्यावेळी नदीपात्रातून येत असलेला दुसरा बिगर नंबरचा ट्रॅक्टर-ट्रॉली दिसल्याने पोलिसांनी तो ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यावेळी रवींद्र काळे व त्याच्या साथीदारांनी पोलिस पथकाला कारवाई करण्यापासून रोखून धरण्यासाठी हवेत दांडपट्टा चालवून दहशत निर्माण केली व सरकारी कामात अडथळा आणला. यावेळी वाळूने भरलेली वाहने व वाळू जप्त केली असून याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक हुंदळेकर तपास करीत आहेत.
 

Tags :  Sand Mafia, Shock Panic, Solapur Police