Fri, Feb 22, 2019 05:23होमपेज › Solapur › शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संभाजी शिंदे यांची निवड

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संभाजी शिंदे यांची निवड

Published On: Aug 25 2018 9:18AM | Last Updated: Aug 25 2018 9:18AMपंढरपूर : प्रतिनिधी 

शिवसेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संभाजी शिंदे यांना कार्यक्षमता आणि पक्षनिष्ठेचे फळ मिळाले असून त्यांची जिल्हाप्रमुखपदी ( पंढरपूर विभाग ) निवड घोषित करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली.

संभाजी शिंदे हे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेल्या १५ वर्षांपासून ते सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख म्हणून काम करीत आहेत. भाळवणी गटातून पंचायत समिती सदस्य, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य म्हणूनही ते गेल्या वर्षांपासून काम करीत आहेत. काँग्रेसच्या साखर सम्राटांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना तालुका प्रमुख म्हणून काम करताना शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा कायम फडकवत ठेवला आहे.

भाळवणी पंचायत समिती गणातून शिंदे हे दोनवेळा विजयी झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक गावांत शिवसेनेचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांच्या निवडीचा शिवसेनेला माढा लोकसभा मतदारसंघात चांगला फायदा होणार असून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यास मोठी जबाबदारी दिल्यामुळे कार्यकर्त्यातून उत्साह संचारला आहे.