Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Solapur › सोलापूर : शालार्थ आयडी मिळालेल्यांचे वेतन ऑफलाईन मिळणार

शालार्थ आयडी मिळालेल्यांचे वेतन ऑफलाईन मिळणार

Published On: Feb 27 2018 12:19AM | Last Updated: Feb 27 2018 12:19AMकरकंब : पुढारी ऑनलाईन

राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणाली नुसार ऑनलाईन होत होते. १२ जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन प्रणाली बंद पडल्याने २ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीला ऑफलाईन वेतन देण्याबाबत शासन आदेश  झाला. परंतु, त्यामध्ये डिसेंबर महिन्याचे व जानेवारी महिन्याचे ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीनुसार झाले होते, त्यांचेच वेतन देण्याचे आदेशीत करण्यात आले होते. शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या अडचणी शासन दरबारी मांडून शालार्थ आयडी मिळालेल्या सर्वांचे वेतन ऑफलाईन देण्याबाबत आदेश काढण्यात आला असल्याची माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.

१२ जानेवारी २०१८ रोजी शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने प्रणाली बंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित शाळेतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने अदा करण्याचे २ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णय झाला. त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर २०१७ व त्या अगोदर काही महिन्याचे वेतन काही कारणास्तव बदली मान्यता, मुख्याध्यापक मान्यत अतिरिक्त समावेशन अशा अनेक कारणांमुळे शालार्थ प्रणालीतून झाले नसल्यास त्यांचे जानेवारी २०१८ चे वेतन ऑफलाईन काढता आले नाही. याबाबत आमदार सावंत यांनी शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांना १२ फेब्रुवारी २०१८ रोजी लेखी पत्र देऊन चर्चा केली होती. त्यावेळी त्वरित दुरुस्तीचे परिपत्रक काढण्याचे आदेशीत केले. त्यामुळे दुरुस्तीच्या परिपत्रकाची संपूर्ण महाराष्ट्रातील वेतनापासून दूर राहिलेल्या शाळा वाट पाहत असताना वेतनाबाबतच्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे वेतनापासून वंचित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी चिंतेत होते.

महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या हक्काच्या वेतनापासून दूर राहिलेले होते. मार्च अखेर आल्याने फारच अडचणीत कर्मचारी आले होते. याची गंभीर दखल घेऊन ज्यांचा शालार्थ आयडी आहे, त्यांचे वेतन ऑफलाईन काढावे यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक आघाडीचे आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील यांनी स्वतः मंत्रालयातील संबंधित प्रत्येक टेबलवर जाऊन दुरुस्ती फाईल पुढे पाठवून आदेश काढण्यास शासनाला भाग पाडले.

दुरुस्ती आदेशामुळे एप्रिल २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंतचे वेतन मिळण्यासाठीचा मार्ग या आदेशाने मोकळा झाला आहे.