Tue, Jul 23, 2019 07:17होमपेज › Solapur › सचिन अधटराव यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर

सचिन अधटराव यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 08 2018 1:34AMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल रुक्मिणीचे झटपट दर्शन मिळवून देणे व दर्शन पास मिळवून देण्यासाठी भाविकांकडून 800 रुपये घेतल्याप्रकरणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांचे नाव समोर आल्याने  मंदिर समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत सचिन अधटराव यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर केला. विधी व न्याय विभागाकडे हा ठराव पाठविण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. झटपट दर्शन मिळवून देतो म्हणून कुणी भाविकांकडून पैसे उकळत असेल, तर तशा लोकांना मंदिर समिती पाठीशी घालणार नाही. मंदिर समिती बैठकीत झटपट दर्शन आणि  त्याअनुषंगाने मंदिर समिती सदस्याचे नाव आल्याने बैठकीत जोरदार चर्चा झाली. पंढरपूर मंदिरे 1973 अ‍ॅक्ट  मधील अधिनियम  26 नुसार चर्चा झाली. यावेळी सर्व सदस्यांनी सचिन अधटराव यांना फैलावर घेतले. त्यांची बाजू मांडण्यास सांगीतले असता मला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकावण्यात आल्याचे अधटराव यांनी सांगीतले. मात्र त्यांच्या खुलाशाकडे दुर्लक्ष करून सर्व सदस्यांनी एकमताने अधटराव यांच्या निलंबनाचा ठराव करून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  सचिन अधटराव यांनी बैठकीत मांडलेली बाजू देखील विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. मंदिर 
समितीकडून बांधण्यात येत असलेल्या भक्त निवासासाठी आवश्यक वाढीव निधीची तरतूद करण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.  या बैठकीस मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजीराजे शिंदे आदींसह आ. राम कदम वगळता सर्व  सदस्य उपस्थित होते.