Thu, Apr 25, 2019 16:11होमपेज › Solapur › ST Strike : सोलापुरातही लालपरी बंद; प्रवाशांचे हाल 

ST Strike : सोलापुरातही लालपरी बंद; प्रवाशांचे हाल 

Published On: Jun 08 2018 1:56PM | Last Updated: Jun 08 2018 1:55PMमंगळवेढा : प्रतिनिधी

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यातील काही भागात पुकारलेल्या बंद ला मंगळवेढ्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला पाठिंबा दिल्याने  बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशाची गैरसोय झाली आहे महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने नातेवाईकांकडे परगावी जाणाऱ्या व आलेल्या प्रवाशांना बसस्थानकावर अडकून पडावे लागले.

बस स्थानक कामगार संपावर असल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहने मिळतात का ?यासाठी धावपळ करीत होते. संप त्वरित न मिटल्यास पावसाच्या वातावरणात प्रवास कसा करायचा असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. अशा अचानक पुकारलेल्या संपामुळे आणि पावसाने प्रवाशी हैराण झाले आहेत. बसस्थानकावर प्रवाशाची गर्दी असून परिवहनच्या वाहनांची व्यवस्था नसल्याने खासगी वाहनधारकाकडे प्रवासी जादा पैसे खर्चून आपला प्रवास करीत आहेत. ग्रामीण भागातील हुन्रूर, शिरनांदगी, लवंगी, सिध्दापूर आदी मार्गावर खासगी  वाहनाधारकांकडून जादा दराने आकारणी करण्यात येत होती.  

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. सरकारने याबाबत तोडगा न काढल्याने दोन वेळा एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप केला होता. प्रत्यक्षात चार हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळाल्याचे कारण देत पुन्हा संपाचे हत्यार उपसले. या संपामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मंगळवेढा आगाराच्या प्रवेशद्वारासमोर एसटीच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या संपामुळे आणि पाऊस यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

स.11 पर्यंत 51 फेऱ्या रद्द झाल्या तर चार फेऱ्या फक्त झाल्या. संपामुळे पंढरपूर, सोलापूर, सांगोला, पुणे,अशा मार्गस्थ असणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनासाठी ताटकळत बसावे लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या संपात शिवसेनेची वाहतूक सेना मात्र सहभागी झाली नाही त्यामुळे काही गाड्या सुरु आहेत.

शिवसेना वाहतूक सेनेवर इतर कर्मचारी नाराज

राज्यभर सर्व कर्मचारी आपल्या मागण्या आणि हक्कासाठी लढा देत असताना सरकारमध्ये परिवहन खाते सेनेकड़े असल्याने शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे कर्मचारी मात्र संपावर गेले नाहीत. त्यामुळे संप परिणामकारक वाटत नाही त्याचा परिणाम म्हणजे एसटी सेवा अंशतः सुरू आहे. फायदा हा सगळ्याच कर्मचाऱ्यांना होणार असल्याने शिवसेनेच्या वाहतूक सेनेने राजकारण न करता यात सामिल व्हायला हवे, अशी अपेक्षा इतर कर्मचारी व्यक्त करीत आहेत.