Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Solapur › एस.टी. महामंडळाला विठोबा पावला!

एस.टी. महामंडळाला विठोबा पावला!

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:48PMसोलापूर : इरफान शेख

ऐन आषाढी वारीत मराठा समाजाच्या आंदोलनाचे एस.टी.वर सावट होते. सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनात एस.टी. टार्गेट झाली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत महामंडळाला यंदा विठोबा पावला आहे. यावर्षी आषाढी वारीत महामंडळाचे उत्पन्न तब्बल 16 कोटींवर गेले आहे, तर सोलापूर विभागाचे उत्पन्नही दुपटीने वाढले आहे.

दिवाळी, गणपती उत्सव,  तुळजापूर यात्रा, आषाढी, कार्तिकी वारी यासह राज्यातील विविध यात्रांच्या माध्यमातून एस.टी. प्रशासनाला जादा वाहतुकीमुळे उत्पन्नामध्ये वाढ होत असते. यासाठी एस.टी. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येते. यंदाही एस.टी. प्रशासनाकडून आषाढीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पण याच कालावधीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो एस.टी. गाड्यांचे नुकसान झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलनाच्या सावटामुळे यंदाच्या उत्पन्नावर परिणाम होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु, महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 

सोलापूर विभागाला आषाढी यात्रा कालावधीमध्ये गतवर्षी 42 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदा 80 लाख 57 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी 57 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा प्रवाशांची संख्या वाढून 96 हजारांवर गेली आहे. यंदा सोलापूर विभागाला 40 लाख रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे, तर प्रवाशांची संख्या तीस हजारांनी वाढली आहे. 
याचबरोबर सोलापूर डेपोचे यंदाचे उत्पन्न चौदा लाख रुपये आहे, तर 19 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षी सोलापूर विभागाला 9 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते, तर 21 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. जरी प्रवाशांची संख्या घटली असली तरी तिकीट दरवाढीमुळे यंदाचे उत्पन्न वाढले आहे.