Mon, May 20, 2019 18:22होमपेज › Solapur › ओव्हरटेकच्या नादात एस.टी. पलटी

ओव्हरटेकच्या नादात एस.टी. पलटी

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 9:56PM बार्शी/वैराग : प्रतिनिधी

बार्शी-तुळजापूर मार्गावर गौडगाव येथील  नागोबा मंदिराजवळच्या वळणावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एस.टी. बस पलटी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. 

जखमींवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.  बार्शी आगाराची एस.टी. बस क्रमांक एमएच 14 बीटी 2644 ही बस गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता बार्शी स्थानकातून तुळजापूरकडे रवाना झाली. बस गौडगावजवळील नागोबा मंदिराच्या पुढच्या वळणावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आली. यावेळी  एस.टी. बसचालक फिरोज जब्बार मुलाणी (रा. बार्शी) याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वळणावर असल्याने गाडी पलटी होऊन सहाही चाके वर झाली.

या अपघातात वैष्णव प्रदीप भड (वय 14, रा. गौडगाव), सुमन काशिनाथ मोरे (45, रा. संगमनेर), उज्ज्वल सुरेश मारकड  (30, रा. शेलगाव), भीमराव सीताराम जाधव (65, रा. निंबळक) हे गंभीर जखमी झाले असून यांच्यावर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तानाजी हनुमंत आगरकर (39, रा. यशवंतनगर),  रामकृष्ण दत्तात्रय बुरगुटे (30, रा .उपळे (दु), नितीन बाळू सुतकर (19, रा. मळेगाव), बळीराम महादेव माळी ( 40, रा. उपळे (दु), चालक फिरोज जब्बार मुलाणी (रा. बार्शी), वाहक राजेंद्र हरी साखरे (रा. बार्शी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.