Sun, Jul 21, 2019 16:24
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सिद्धेश्‍वर महायात्रेला नऊ शतके पूर्ण

सिद्धेश्‍वर महायात्रेला नऊ शतके पूर्ण

Published On: Jan 19 2018 2:01AM | Last Updated: Jan 18 2018 10:51PMसोलापूर : इरफान शेख

शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने सोन्नलगीला म्हणजे आजच्या सोलापूरला भू-कैलास अशी प्रतिष्ठा प्राप्त  झाली. श्री सिद्धरामेश्‍वरांनी सोलापुरात नऊ शतकांपूर्वी 68 शिवलिंगांची स्थापना  केली. आपल्या शिष्यांच्या आणि जनसामान्यांच्या श्रमदानातून तलावाची निर्मिती केली. तलावाला तीर्थाची प्रतिष्ठा लाभली. सुमारे नऊशेहून अधिक वर्षांची परंपरा आजही कायम असून आजही अखंड अविरतपणे त्याच उत्साहात मोठ्या भक्‍तिभावाने यात्रा झाली. योगदंड पूजा, नंदीध्वज मिरवणुका, अक्षता सोहळा, होमहवन हे सर्व विधी कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडले.

सिद्धरामेश्‍वर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशांतील असंख्य भाविकांचे श्रद्धाविषय होऊन कायम राहिले आहे. तीनही राज्यांतील भाविक यात्रेत सहभाग घेतेत. दरवर्षी संक्रांतीच्या मुहूर्तावर सोलापूरला सिद्धेश्‍वर यात्रा भरते. या यात्रेला सिद्धेश्‍वर महायात्रा किंवा गड्डा यात्रा म्हणून ओळखले जाते. यंदाच्या वर्षी होमहवन विधीला जाताना नागफणी नंदीध्वजाचा तोल जाऊन इलेक्ट्रिक डीपीवर पडला. सिद्धेश्‍वर महाराजांच्या कृपेने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. भाविकांनी व सोलापूरकरांनी या घटनेला किरकोळ घटना म्हणत त्याचा बाऊ केला नाही व होऊ दिला नाही.
संक्रांतीवेळी सोलापूरला सिद्धेश्‍वर यात्रा भरते. त्या यात्रेत योगदंडाची पूजा, नंदीध्वजांची मिरवणूक, अक्षता सोहळा व होमप्रदीपन, शोभेचे दारूकाम (किंक्रांत), कप्पडकळी, सुगडी पूजन, गंगापूजन असे मुख्य कार्यक्रम होतात. यापाठीमागे एक प्रसिद्ध अशी कथा आहे. ती अशी :

सिद्धराम योगसाधनेत मग्न असत. ते जेव्हा साधना  स्थलाच्या बाहेर येतात तेव्हा त्यांना अंगणात शेणसडा घालून सुरेख रांगोळी रेखलेली दिसत असे. हे काम कोण करते हे त्यांना कळेना. एकेदिवशी ते नेहमीच्या वेळेआधी साधनागृहातून बाहेर आले. तेव्हा एक सुंदर तरुणी सडा घालून रांगोळी रेखत असलेली त्यांना दिसली. तिनेही विस्मयचकित होऊन नमस्कार केला. शिवयोगी सिद्धरामांनी त्या तरुणीला प्रश्‍न केला, तू कोण आहेस आणि हे काम का करीत आहेस. तरुणीने उत्तर दिले, मी एक कुंभार कन्या आहे. आपली सेवा घडावी म्हणून मी रोज अंगणात सडा घालून रांगोळी काढते. 

सिद्धरामांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांना कळले की, त्या कुंभार कन्येची त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तिने आपली इच्छा व्यक्‍त केल्यावर सिद्धराम म्हणाले, मी  लिंगांगी आहे. मल्लिकार्जुन माझे पती असून मी त्यांची सती आहे. अशास सती - पतीभावाने मी साधना करीत आहे. मग एका स्त्रीचा दुसर्‍या स्त्रीशी विवाह कसा होऊ शकेल. सिद्धरामांनी तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. तेव्हा तिने अत्यंत व्याकुळतेने त्यांची विनवणी केली. शेवटी सिद्धरामांनी तिला आपल्या योगदंडाशी प्रतिकात्मक लग्न करण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्या कुंभार कन्येने योगदंडाशी लग्‍न लावले.

या प्रतिकात्मक विवाह सोहळयात स्वतः सिद्धरामेश्‍वर सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी हरिद्रालेपन, यण्णीमंजन (तैलाभिषेक) होऊन विवाहविधीचा आरंभ झाला. सिद्धरामांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना व सर्व देवतांना अक्षता दिल्या. दुसर्‍या दिवशी देवालयाच्या परिसरात संमती कट्ट्यावर अक्षताविधी पार पडला. सर्व देवतांनी व उपस्थित आबालवृध्दांनी अक्षता टाकल्या. सिद्धरामांनी स्वतः रचलेली पाच मंगलाष्टके म्हटली. अक्षताविधीनंतर वरात निघाली. पंचक्रोशीतील सर्व देव-देवतांना व 68 लिंगांना भेटी देऊन वरात परत आली. तिसर्‍या दिवशी मकर संक्रमणाच्या पर्वकाली योगदंडाला पवित्र तळ्यात स्नान घालण्यात आले. 

कुंभार कन्या सचैल स्नान करून सौभाग्यलेणे घेऊन सती जाण्यास सिद्ध झाली. आपल्याला अध्यात्मिक मुक्‍ती मिळाली असे मानून होमकुंडात उडी घेऊन ती सती गेली.सिद्धेश्‍वर यात्रेमध्ये  मंदिर समितीकडून हा विवाहविधी दरवर्षी यात्रेच्या वेळी सर्व तपशीलांसह साजरा केला जातो. नंदीध्वज हा सिद्धरामांच्या योगदंडाचे प्रतीक होय.  नंदीध्वज, अक्षता सोहळा व होमप्रदीपन सोहळा या प्रथेमागे अशी कहाणी आहे. नंदीध्वजांची संख्या पुढे वाढत गेली. हल्ली मानाचे सात नंदीध्वज असतात. हे पुढीलप्रमाणे ः 

पहिला नंदीध्वज सिद्धेश्‍वर देवस्थानचा, दुसरा कसब्यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा विश्‍वब्राह्मण समाजाचा, पाचवा सोनार समाजाचा, सहावा मातंग समाजाचा व सातवा दलित समाजाचा. अशाप्रकारे सर्व जाती-धर्मातील लोक यात्रेत व यात्रेतील सर्व सोहळ्यात सहभागी होतात. सिद्धरामेश्‍वरांना दैवतरूप  लाभल्यामुळे  ते सोलापुरातील सर्वांचे दैवत आहेत. श्री सिद्धेश्‍वर हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे. यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांतील भाविक  लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे यात्रेला खूप महत्त्व आहे. या यात्रेसाठी प्रशासनाकडून मोठे नियोजन करण्यात येते. 

नऊ शतकांपासून धार्मिक विधीला तोच उत्साह
श्री शिवयोगी सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या महायात्रेला भाविकांत तोच उत्साह कायम आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांतील भक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात. गेल्या नऊ शतकांपासून सिध्देश्‍वर महायात्रा होत आहे. यंदाच्या वर्षीदेखील कोणत्याही विघ्नाशिवाय ही यात्रा झाली. किरकोळ घटनेसह यात्रेतील सर्व धार्मिक विधी झाले. अखंडपणे अविरत गेल्या नऊ शतकांपासून ही यात्रा होत आहे. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या यात्रेने सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर टाकली आहे.