Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Solapur › रमेश कदमांच्या फंडातून मोहोळ शहराला २० लाखांचा निधी 

रमेश कदमांच्या फंडातून मोहोळ शहराला २० लाखांचा निधी 

Published On: Jan 22 2018 11:58AM | Last Updated: Jan 22 2018 11:58AMमोहोळ : महेश माने

मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश कदम यांनी मतदार संघात महत्वाच्या व अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांना प्राधान्य देत विकास कामांचा धडाकाच सुरु केला आहे. मोहोळ शहराच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी आमदार कदमांच्या आमदार फंडातून सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍यांसाठी (क्लोज सर्कीट कॅमेरे) वीस लाख रुपये विकास निधी मंजूर झाला आहे. या कामाचे प्रशासकीय मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयाला प्राप्त झाले आहे. मोहोळ हे या विधानसभा मतदार संघातील सर्वांत जास्‍त  लोकसंख्येचे शहर असल्यामुळे आमदार रमेश कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून हे क्लोज सर्कीट कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे प्रतिनिधी अमित वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या निधीतून बसविण्यात येणार्‍या कॅमेर्‍यांमुळे मोहोळ शहरात रात्री अपरात्री होणार्‍या चोर्‍या तसेच गंभीर स्वरुपाच्या लुटमारीच्या घटनांना पायबंद बसणार आहे. शिवाय शहरातील गुन्हेगार लोकांवर या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार असून, शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच खोट्या दाखल होणार्‍या दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. अत्यंत महत्वाच्या प्रश्‍नासाठी आमदार रमेश कदम यांनी हा वीस लाख रुपयांचा निधी मोहोळ शहराला दिल्यामुळे शहराच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्‍न आता कायम स्वरुपी निकालात निघणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रशासनाकडून या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार आहे. 

गेल्या वर्षभरापासून मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पोलिस प्रशासनात गतीमानता व अत्याधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी मोहोळ पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपन करुन ग्रीन ऑफिस संकल्पना यशस्वी केली. त्याचबरोबर मोहोळ पोलिस ठाण्याला आय.एस.ओ मानांकन देखील मिळवून दिले आहे. मात्र, मोहोळ शहर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत यावे यासाठी त्यांनी लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आ. रमेश कदम यांचे स्वीय सहाय्यक सतीश भोसले हे कार्यालयीन कामासाठी मोहोळ येथे आले होते. त्यावेळी मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सी.सी.टी.व्ही उपक्रमासाठी आमदार कदमांच्या आमदार फंडातून निधी देण्याबाबत सुचविले होते. त्यांनंतर आ. रमेश कदम यांनी सी.सी.टी.व्ही कॅमेरे हे केवळ पोलिस स्टेशन परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात बसविण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी देण्याची ग्वाही मोहोळवासीयांना दिली होती.  

      
याबाबतचे पत्र त्यांनी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा नियोजन अधिकारी सोलापूर यांना दिले होते. आमदार कदम यांनी हे पत्र तर, दिलेच शिवाय याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधुन मोहोळ शहरासाठी तब्बल वीस लाख रुपयांचा निधी २० जानेवारी २०१८ रोजी मंजूर केला आहे. त्यामुळे मोहोळ शहराच्या अंतर्गत सुरक्षिततेचा अत्यंत महत्वाचा प्रश्‍न सोडविल्या बद्दल मोहोळ शहर वासियांनी आमदार रमेश कदम यांचे आभार मानले आहेत. 

आमदार रमेश कदम हे गेल्या अनेक महिन्यापासून जेलमध्ये असुनही मतदार संघाचा विकास करण्याची त्यांची धडपड कमी होताना दिसत नाही. मोहोळ शहरातील व्यापारी बांधव व सामान्य नागरिकांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी त्यांनी शहरात तब्बल वीस लाख रुपयांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात केबल कनेक्टीव्हीटी आणि अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविल्यानंतर मोहोळ शहर जिल्ह्यातील सर्वांत हायटेक शहर म्हणून नावारुपाला येणार आहे.