Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Solapur › रे-नगरसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर

रे-नगरसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 29 2018 12:15AMसोलापूर : प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरातील रे-नगर फेडरेशनच्या 30 हजार घरांच्या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
माजी आमदार नरसय्या आडम  यांच्या उपस्थितीत व ‘सिटू’चे महासचिव एम. एच.  शेख, नलिनी कलबुर्गी, सचिव  यूसुफ शेख (मेजर) यांच्यासह रे-नगरअंतर्गत विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व ‘सिटू’च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जल्लोष केला. 

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरातील 30 हजार घरांच्या प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर केंद्र शासनाने केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने 24 जुलै 2017 रोजी मंजुरी दिली होती. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी झाला होता व त्यानंतर प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन व  केंद्र शासनाचे अनुक्रमे 1 लाख रुपये व 1.50 लाख रुपये प्रतिलाभार्थी अनुदान असे एकूण 2.50 लाख रुपये प्रतिलाभार्थी वितरित होणार आहेत.

 राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर  24 मे 2018 रोजी शासन आदेश काढून राज्य शासनाच्या हिश्श्याचा निधी 25 कोटी रुपये एवढ्या मर्यादेपर्यंत वितरित करण्यास  शासन मान्यता  देण्यात आली. त्याअनुषंगाने रे-नगर सोलापुरातील 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाला राज्य शासनाच्या हिश्श्याचा 40 टक्के निधी (प्रति लाभार्थी रु. 40,000) अर्थात 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

हा निधी अभियान संचालक, प्रआयो (महाराष्ट्र राज्य) यांच्यामार्फत रे-नगर फेडरेशनला लवकरच वितरित होईल. या निधीमुळे रे-नगर फेडरेशनच्या 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाच्या बांधकामास अधिक जोरदार गती मिळेल व लवकरात लवकर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यास मदत होईल. 

रे-नगरसाठी झालेली बैठक अवर मुख्यसचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी  अभियान संचालक (केंद्र-प्रआयो) अमित अभिजात, अभियानाचे संचालक मुगळीकर, माजी आमदार नरसय्या आडम, प्रकल्प सल्लागार अभियंता अमोल मेहता, विकासक पंधे आदी उपस्थित होते. 

सप्टेंबर महिन्यात रे-नगरची पाहणी होणार
या निधीमुळे रे-नगर फेडरेशनच्या 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाच्या बांधकामास अधिक गती मिळेल व लवकरात लवकर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यास मदत होईल. 18, 19 सप्टेंबर 2018 रोजी प्रत्यक्षात साईट व्हिजिट करण्याचे व या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्‍वासन मंत्रालय स्तरावरून देण्यात आले आहे.