Wed, Apr 01, 2020 23:51होमपेज › Solapur › पापळ फाट्यावरील शेतीवस्तीवर दरोडा

पापळ फाट्यावरील शेतीवस्तीवर दरोडा

Last Updated: Feb 25 2020 1:26AM
टेंभूर्णी : पुढारी वृत्तसेवा
जाफराबाद तालुक्यातील अकोला देव शिवारातील  टेंभूर्णी देऊळगावराजा रोड दरम्यान पापळ फाट्याजवळ शेतवस्तीत राहणार्‍या कचरूबा लक्ष्मण बोरुडे यांच्या शेतवस्तीवर पाच दरोडेखोरांनी मारहाण करत 46 हजार दोनशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना रविवारी (दि. 23) रात्री घडली. 

टेंभूर्णी- देऊळगावराजा रोड लगत पापळ फाट्याजवळ अकोला देव शिवारातील गट क्रमांक 217 मध्ये कचरूबा लक्ष्मण बोराडे हे आपली पत्नी व इतर नातेवाईकांसह पत्र्याचे शेड करून शेतातच राहतात. रविवारी  रात्री पाच दरोडेखोरांनी त्यांच्या झोपडीत प्रवेश करून जबर मारहाण केली.

यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या जिजाबाई भगवान मगरे, गुंफाबाई कचरूबा बोरुडे यांच्या अंगावर असलेले सोन्या-चांदीचे दागिने दरोडेखोरांनी मारहाण करीत काढून घेतले. सेव्हन पीस, जोडवे, चांदीचे दंड कडे, मासोळ्या सोन्याचे मणी, डोरले, सोन्याची पोत असा 46 हजार 200 रुपयांचा सोन्या-चांदीचा दागिने लुटून नेले. या मारहाणीमध्ये कचरूबा लक्ष्मण बोरुडे ,गुंफाबाई कचरूबा बोरुडे , नितीन पांडव  हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी जिजाबाई मगरे यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन ,प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.