Wed, May 22, 2019 06:50होमपेज › Solapur ›  रात्रीत यशवंतनगरातील सोळा दुकाने फोडली

 रात्रीत यशवंतनगरातील सोळा दुकाने फोडली

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 18 2018 12:31AMपानीव : वार्ताहर

यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील पानीव व विजयवाडी रस्त्यावर असणार्‍या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर असणारे सोळा व्यापारीगाळे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केली आहे. यात हजारो रुपयांचा माल लंपास केला. एकाच रात्रीत तब्बल सोळा दुकानांची शटर उचकटून चोरी करण्यात आल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. अकलूज येथे गेल्या वर्षी नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यशवंतनगर येथे नवीन इमारतीत  स्थलांतरित झाल्यानंतर या इमारतीसमोर  व्यवसायासाठी व्यापारी गाळे उभारले.

यामध्ये लायसन्स, विमा, हॉटेल, किराणा आदी दुकाने आहेत. दररोज या ठिकाणी करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस या चार तालुक्यांतील हजारो वाहनधारकांची विविध कामांसाठी रेलचेल असते. यामुळे येथे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, हीच बाब हेरून चोरट्यांनी डाव साधून एकाच रात्रीत तब्बल सोळा दुकानांची शटर उचकटून चोरी केली. यामध्ये हजारो रुपयांची रोकड चोरीला गेलेली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

ज्यांची दुकाने फोड़ली ते काल उशीरापर्यत दुरूस्ती करत असल्यामुळे गुन्हा नोंद होण्यास विलंब झाला. या  चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसात या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले असून त्याला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. येथील दोन नंबर गाळयामध्ये काहीच व्यवहार होत नाही. तो गाळा मोकळा असतो. त्यामुळे या गाळ्याला चोरट्यांनी हातही लावलेला नाही. त्यामुळे चोरट्यांनी या परिसराची व्यवस्थित रेकी करून नियोजनबद्ध चोरी केलेली आहे, ही बाब लक्षात येण्यासारखी आहे.