Mon, Apr 22, 2019 05:40होमपेज › Solapur › बार असोसिएशनवर विधी सेवा पॅनेलचे वर्चस्व

बार असोसिएशनवर विधी सेवा पॅनेलचे वर्चस्व

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 10:31PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर बार असोसिएशनच्या 2018-19 च्या वार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत विधी सेवा पॅनेलने वर्चस्व मिळविले.  यात विधी सेवा पॅनेलने वर्चस्व राखले असले तरी पॅनेलप्रमुख राजेंद्र फताटे यांचा पराभव झाला आहे. 

यात विशेष म्हणजे नूतन अध्यक्षपदी, उपाध्यक्ष आणि सचिव या महत्त्वाच्या पदावर ‘संतोष’ नावाचीच  निवड झाली आहे. या संतोषरुपी योगायोगाची न्यायालयात तोंडभरून चर्चा होत आहे.  

सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 1134 पैकी 975 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. जवळपास 85.97 टक्के मतदान झाले होते.  गतवर्षीच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष अ‍ॅड. हिराचंद अंकलगी यांनी काम पाहिले.  

आता  बुधवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता वार्षिक सर्वसाधारण  सभा व निकाल जाहीर करणे, नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे.  चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये विधी सेवा पॅनेलने तीन जागा जिंकत वर्चस्व राखले आहे. विधी विकास पॅनेलने दोन जागा जिंकल्या आहेत. जनसेवा पॅनेलचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.  अध्यक्षपदासाठी विधी सेवा पॅनलचे प्रमुख अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी प्रतिस्पर्धी विधी विकास पॅनेलचे प्रमुख राजेंद्र फताटे यांचा पराभव केला.  

मतमोजणीमध्ये उपाध्यक्षपदासाठी उभे असलेले संतोष पाटील आणि विद्यावंत पांढरे यांच्यात चुरस झाली. दोघांमध्ये काही फेर्‍यांमध्ये समसमान मते पडत होती. तर सचिवपदासाठी अ‍ॅड. संतोष होसमनी हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. खजिनदार पदासाठी विधी सेवा पॅनेलचे महेंद्र वड्डेपल्ली यांनी अ‍ॅड. दयानंद माळी यांचा 51 मतांनी पराभव केला. तर सहसचिवपदासाठी महिलांमध्ये झालेल्या दुरंगी लढतीत विधी विकास पॅनेलच्या स्वप्नाली चालुक्य यांनी सर्वाधिक 753 मते घेऊन विधी सेवा पॅनलच्या अ‍ॅड. शाहीन शेख यांचा तब्बल 552 मताने पराभव केला. 

बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी अ‍ॅड. संतोष न्हावकर, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. संतोष पाटील, तर सचिवपदी अ‍ॅड. संतोष होसमनी हे तिघे विजयी झाले आहेत. यामध्ये योगायोगाने तिघांची नावे ‘संतोष’ आहेत. विजयी उमेदवारांनी वर्षभरात वकिलांच्या अडीअडचणी व समस्या सोडवून समाधानकारक कामगिरी करण्याचे आश्‍वासन दिले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांचे अनेकांनी अभिनंदन केले.