Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Solapur › पंढरपूर येथील साठ मीटरचा रिंगरोड रद्द

पंढरपूर येथील साठ मीटरचा रिंगरोड रद्द

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी   

 पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 60 मीटर रुंदीचा रिंगरोड रद्द करण्याच्या प्रस्तावास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पंढरपूर विकास प्राधिकरणाची गुरुवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सदस्य कल्याणराव काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, नगररचनाचे सहायक संचालक प्रभाकर नाळे उपस्थित होते.

पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित हद्दीभोवती असणारा 60 मीटरचा रिंगरोड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वाखरी, भंडीशेगाव, देगाव येथील पालखीतळ आणि वाहनतळासाठी राखीव असलेल्या जागा आरक्षणातून वगळून प्रस्तावित पिलग्रिमेज मेनिटी झोनमध्ये समावेश कराव्यात, असा निर्णय घेण्यात आला.

प्राधिकरणाच्या हद्दीतील रिंगरोडची रुंदी 45 मीटरऐवजी 30 मीटर प्रस्तावित करण्यात आली. पोलिस स्टेशनला जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजन समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्यात येऊन आराखडा मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत नगररचना सहाय्यक संचालक प्रभाकर नाळे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.