Sun, May 26, 2019 01:17होमपेज › Solapur › रस्ते अपघातातील जखमींना मदत करणार्‍यांना बक्षीस

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणार्‍यांना बक्षीस

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:23PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिसांची कटकट मागे नको म्हणून रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याचे टाळले जाते. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने रस्ते अपघातातील  जखमींना मदत करणार्‍या व्यक्ती किंवा संस्था किंवा समूहांना रोख स्वरूपातील बक्षिसे देण्याचे जाहीर केले आहे. राज्यामध्ये  दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते वाहन अपघात होतात. त्यामध्ये साधारणपणे  दरवर्षी 13 हजार लोकांचा  मृत्यू होतो, तर सरासरी 45 हजार  लोक जखमी  होतात. रस्त्यामध्ये अपघात झालेला दिसल्यानंतर थांबून त्यातील जखमींना मदत करण्याची भूमिका इतरांकडून घेण्यात येत नाही आणि जो कुणी जखमींना मदत करण्याच्या उद्देशाने मदत करतो तर त्याला डॉक्टर व पोलिसांकडून नाही नाही ते प्रश्‍न विचारून हैराण करून सोडण्यात येते.

त्यामुळे जखमींना मदत  करण्यासाठी इतर कुणीही पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. अपघातातील   जखमींना   वैद्यकीय  व इतर मदत तातडीने न मिळाल्याने अनेकांना प्राण  गमवावे   लागतात व  त्यांची  कुटुंबे उद्ध्वस्त होतात. रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून तसेच पोलिसांकडून होणारी  विचारपूस नको म्हणून अपघात समोर घडलेला असूनही इतर लोक बिनधास्तपणे निघून जातात. रस्ते अपघातातील जखमींना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली तर अनेकांचे जीव वाचले जाऊ शकतात, हे निदर्शनास आल्यानंतर अपघातातील  जखमींना मदत करणार्‍या तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणार्‍या नागरिक, संस्थांना बक्षिसे देण्याचा विचार शासनाकडून करण्यात येत होता.

त्यानुसार शासनाकडून रस्ते अपघातातील   जखमींना  मदत करणार्‍या, जखमींचे प्राण वाचविण्यासाठी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणार्‍या व्यक्ती, संस्थांना 1 लाख 50 हजार रुपये, 1 लाख रूपये आणि 50 हजार रुपये, अशी बक्षिसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच शहर पोलिस आयुक्‍तालयातील वाहतूक शाखेचे  प्रमुख हे अपघातग्रस्तांना संबंधित व्यक्ती, संस्थांनी   केलेल्या  मदतीसंदर्भात   त्यांना बक्षिसे देण्याबाबतचा प्रस्ताव अपघात    घडल्यापासून   एक महिन्याच्या कालावधीत शासनाकडे सादर करावा लागणार आहे. प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर गृह विभागाचे अपर मुख्य सचिव (विशेष), प्रधान सचिव, अपर  पोलिस महासंचालक (वाहतूक), सहसचिव (विशा 9), सहसचिव (पोल 8) यांच्या समितीकडून या प्रस्तावांची छाननी करुन योग्य व्यक्ती व  संस्थांची बक्षीसासाठी निवड करण्यात येणार आहे.