Thu, Apr 18, 2019 16:37होमपेज › Solapur › क्रांती गीतांनी आंदोलनात भरला जोश

क्रांती गीतांनी आंदोलनात भरला जोश

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:54PMपंढरपूर : प्रतिनिधी

तोड मर्दा, तोडली चाकोरी, तोड, तोड, तोड, तोडली चाकोरी अशा जोषपूर्ण क्रांती गीतांनी येथील तहसील कार्यालयासमोर  सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात दुसर्‍या दिवशी जोष भरला. याच दरम्यान बाल वक्त्यांनी अंगावर शहारे आणणारी भाषणे सादर करून उपस्थित शेकडो आंदोलकांना प्रेरित केले. विविध मान्यवरांच्या भेटी, संघटनांच्या पाठिंब्यामुळे ठिय्या आंदोलन दुसर्‍या दिवशी अधिक व्यापक आणि उत्साहवर्धन ठरले आहे. 

येथील तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी भाळवणी जि.प.गटातील लोकांनी दिवसभर आंदोलन केल्यानंतर रात्री पंढरपूर शहरातील युवकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. दुसर्‍या दिवशी वाखरी जि.प.गटातील मराठा समाजातील आंदोलकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वाखरीसह कौठाळी, खेडभाळवणी, शेळवे, वाडीकुरोली, पिराची कुरोली, देवडे, भंडिशेगाव, पटवर्धन कुरोली या गावातील शेकडो युवक, जेष्ठ नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी 11 च्या सुमारास शेकडो युवक मोटार सायकलवरून घोषणाबाजी करीत आंदोलन स्थळी दाखल झाले होते. सकाळच्या सत्रात बाल वक्त्यांची मराठा आरक्षणासंदर्भात आवेषपूर्ण भाषणे झाली. तर दुपारी अ‍ॅड. विनायक सरवळे यांनी मराठा आरक्षण आणि कायदेशीर पेच यासंदर्भात सुमारे पाऊण तास मार्गदर्शन  केले. त्यानंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे प्रवक्ते मोहन अनपट यांनी क्रांती गीते सादर करून आंदोलनात जोष भरला. 

‘आता उठवू सारे रान, आता पेटवू ‘सारे रान’ ! त्याचबरोबर ‘तोड मर्दा, तोडली चाकोरी’ अशा क्रांती गीतांनी सर्वच उपस्थित आंदोलकांना उत्साहीत केले. दुसर्‍या दिवशी आंदोलनास शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच दिवसभरात भेटून जाणार्‍या लोकांचीही संख्याही मोठ्या प्रमाणात होती. यावेळी आ.भारत भालके, माजी आ. अ‍ॅड. शहाजी पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, वाखरी जि.प.गटाच्या सदस्या सौ. सविता निखीलगीर गोसावी यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला तसेच पाठिंबा व्यक्त केला.  अण्णा भाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा वाघमारे , गडशी समाज संघटनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हासंघटक दिलीप धोत्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत येऊन आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला. सायंकाळी  4 वाजता कवी संमेलन झाले. यावेळी कविंनी आपल्या काव्य पंक्तींच्या माध्यमातून आरक्षण आणि शासकीय धोरणावर जोरदार टीका केली. 

आज कासेगाव जि.प.गटाचे आंदोलन
आज ( दि.4 ऑगस्ट ) रोजी तहसील समोर कासेगाव जि.प.गटातील सर्व गावांतील नागरिक ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे प्रवचन दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आले आहे.