Fri, Apr 26, 2019 18:12होमपेज › Solapur › ‘सरोगसी’ समितीमुळे व्यापारीकरणावर येणार निर्बंध

‘सरोगसी’ समितीमुळे व्यापारीकरणावर येणार निर्बंध

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:52PMसोलापूर :  रामकृष्ण लांबतुरे 

‘सरोगसी’ या विषयाबाबत अनेकजण अज्ञात आणि अनभिज्ञ आहेत.  हा विषय मुंबई, दिल्ली, नोएडा, कोलकाता अशा मोठ्या महानगरांमध्ये ऐकावयास मिळतो. यातून व्यापारासह गुन्हेगारीही निर्माण होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठीच आरोग्य विभागाने राज्यस्तरीय नियंत्रण समिती स्थापन केली आहे.  

जन्मतःच   गर्भाशय  नसणे, गर्भधारणा होण्यात अडचणी, एखाद्या जोडप्याला मूल होण्यात काही अडचण असल्यास सरोगसीसाठी परवानगी दिली जाते. मात्र काही लोक या पर्यायाचा वापर केवळ पैसे कमावण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरोगसीच्या माध्यमातून होणारे व्यापारीकरण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून यासंदर्भातील कार्यप्रणाली निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. 

जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर व इतर पाचजणांविरोधात शुभांगी भोस्तेकर यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून सरोगसीच्या व्यापारीकरणावर निर्बंध आणण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. 

त्यामुळे सरोगसीची कार्यप्रणाली निश्‍चित करताना भोस्तेकर प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करण्यात यावा. सरोगसीसाठी भाडोत्री गर्भ देणार्‍या स्त्रीचे व जन्म घेणार्‍या मुलाच्या भवितव्याच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही विचार करावा. या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
देशभरातील सरोगसीविषयी कायदा अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रकार अनियंत्रितपणे चालू आहे. अनियंत्रित चालणारी सरोगसी केंद्रे, रुग्णालये यांच्यावर नियंत्रण आणावे, आई व मुलाच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात  याव्यात, राज्यातील सरोगसी केंद्रांची नोंदणी करण्यात यावी, सरोगसी प्रकरणे आणि सरोगसी केंद्रे, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालावीत, यासाठीच राज्य स्तरावर नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची शिफारस बाल हक्क संरक्षण आयोगाने केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने सात सदस्यांची एक समिती गठीत केली आहे. ही राज्यस्तरीय नियंत्रण समिती तीन महिन्यांत शासनाचा अहवाल सादर करणार आहे. त्यात सोलापूरच्या सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे यांची निवड झाल्याने सोलापूरच्यादृष्टीने ही भूषणावह बाब आहे.