Sat, Apr 20, 2019 09:59होमपेज › Solapur › मराठा आरक्षणप्रश्‍नी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मराठा आरक्षणप्रश्‍नी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 10:20PMतुळजापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुळजापूर येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित साळुंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्याकडे पाठवले आहे.

राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. समाजाने 58 मूकमोर्चे अत्यंत शातंतापूर्ण आणि सनदशीर मार्गाने काढले. मात्र, अद्यापही यावर ठोस निर्णय होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने सत्तेवर आल्यास मराठा आरक्षण देऊ, असे आश्‍वासन दिले होते. स्थानिक कार्यकर्ते म्हणून आम्हीही तोच मुद्दा घेऊन प्रचार केला. याच मुद्द्यावर पक्षाची सत्ताही आली. मात्र, सत्ता येऊन 4 वर्षे उलटून गेली आहेत. 

तरीही आरक्षणाचा तिढा सुटला नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष खदखदत आहे. या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी मोठी आंदोलने होत आहेत. गेल्या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही मते मागितली होती. आता तेच मतदार जनता आम्हाला रोखून जाब विचारत आहे. पक्षाकडून वैयक्तिक कसलीही अपेक्षा नव्हती आणि नाही. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न त्वरित सोडवावा. ज्या मुद्द्यावर सत्ता आली तो शब्द पाळून आरक्षण लवकर द्यावे. पक्षाचे काम करताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी कुचंबणा होत आहे. समाजातील लोक फितूर सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत. त्यामुळे मराठा समाजास त्वरित आरक्षण द्यावे. ही मागणी करत आपल्या भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.