होमपेज › Solapur › ट्रेन कोचवर आरक्षण चार्ट रद्द

ट्रेन कोचवर आरक्षण चार्ट रद्द

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:59PM
सोलापूर : इरफान शेख

मध्य रेल्वेने एक पाऊल डिजिटल इंडियाकडे वळविले असून रेल्वेचे कामकाज हळूहळू आता डिजिटल होत आहे. 1 सप्टेंबरपासून पेपरलेसचा भाग म्हणून ट्रेनवर लावण्यात येणारे आरक्षण चार्ट यापुढे भविष्यात लावले जाणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

एक्स्प्रेस, मेल, शताब्दी, दुरांतो आदी गाड्यांवरील कोच किंवा बोगीवर यापूर्वी आरक्षण चार्ट लावले जात होते. प्रवाशी डब्यामध्ये आत जाताना चार्टवरुन आपल्या सीटची खात्री 
करत होते. सध्या डिजिटलायझेशनच्या काळात रेल्वेने पुढाकार घेतला आहे.1 मार्च 2018 पासून पायलट परियोजनेेंतर्गत देशातील सर्व ‘ए क्लास’ व ‘बी क्लास’ स्थानकांवर आरक्षण चार्ट रेल्वेच्या डब्यांवर चिटकावणे बंद करण्यात आले होते. ही पायलट योजना सफल झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2018 पासून  देशातील सर्व स्थानकांवरुन  धावणार्‍या मेल एक्स्प्रेस, शताब्दी, दुरांतो आदी गाड्यांवर यापुढे हे चार्ट दिसणार ही.प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षणाची माहिती रेल्वे स्थानकांवरील डिजिटल इंडिकेटरवर दिसणार आहे. ज्या रेल्वे स्थानकांवरील डिजिटल इंडिकेटर बंद असेल त्याला तात्काळ दुरुस्त केले जाईल किंवा ते चालू होईपर्यंत कागदावरील आरक्षण चार्टचा उपयोग केला जाईल.

रेल्वेमधील कागदोपत्री कामकाज डिजिटल स्वरुपात रूपांतरित करून, डिजिटलायझेशन म्हणून ओळखली जाणारी प्रक्रिया आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे आरक्षित तिकीट देखील मोबाईल किंवा एसएमएसद्वारे वितरीत करण्यात येत आहे. त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

2019 पर्यंत इंग्लड देशात तेथील स्थानिक रेल्वे विभाग पेपरलेस होणार आहे. तर त्याच इंग्रजांनी भारतात सुरु केलेली भारतीय रेल्वे हळूहळू पेपरलेस होत आहे. भारतीय रेल्वेला पूर्णत: पेपरलेस होण्यासाठी जवळपास 2050 हे वर्ष उजाडणार असल्याचे मत तज्ज्ञांनी यापूर्वी व्यक्त केले आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वे डिव्हिजनमध्ये अनारक्षित तिकटे मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळत आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेने एक नविन सिस्टीम सुरू केली आहे, ज्याद्वारे प्रवासी त्यांचे स्मार्ट फोन वापरून अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी करू शकतात. अनारक्षित प्रवाशांसाठी पेपरलेस रेल्वे तिकिटे सादर करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. भुवनेश्‍वर येथे अनस्रसिड टिकेटिंग सिस्टम (यूटीएस) आधारित मोबाईल अ‍ॅपने सुरू केली. मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक असे आहे की, प्रवाशांनी अ‍ॅप्लीकेशनद्वारे त्यांच्या मोबाईलचा वापर करून अनारक्षित तिकिटाचा लाभ घेऊ शकतात.

भारतीय रेल्वे भविष्यात प्रावाशांसाठी उत्तम सेवा देत कागदोपत्री सर्व कामकाज बंद करणार असल्याची  माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.