Thu, Jul 18, 2019 16:35होमपेज › Solapur › सिध्दरामेश्‍वर मंदिरात श्रावण मासानिमित्त फुलणार भक्‍तीचा मळा

सिध्दरामेश्‍वर मंदिरात श्रावण मासानिमित्त फुलणार भक्‍तीचा मळा

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर महाराजांच्या मंदिरात श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त योगसमाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रावण मासानिमित्त महिनाभर भक्‍तांची मोठी गर्दी होणार असल्याने मंदिर समिती प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 

सिध्देश्‍वर मंदिरात श्रावणमासानिमित्त जणू जत्रा भरते.  विशेषतः श्रावण सोमवारी सिध्देश्‍वरांचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोकांची गर्दी मंदिरात दिवसभर असते. त्यामुळे भाविकांना दर्शनाची सोय सुलभ व्हावी, यासाठी बॅरीगेट्स, मंदिराच्या पुलापर्यंत दुतर्फा प्रासादिक साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय येणार्‍या भाविकांसाठी अन्नछत्राद्वारे मोफत महाप्रसादाची वेळ आणि सेवा देणार्‍या सेवेकरींची संख्या वाढविण्यात आली आहे.

श्रावणमासातील दिनक्रम 
पहाटे 5 वा. श्रींच्या मूर्तीस अभिषेक व काकड आरती,  5.30 वा. श्रींच्या शिवयोगी समाधीस अभिषेक व आरती, सकाळी 7 ते 9 पर्यंत श्रींच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक पूजा बिल्वार्चन शिवपंचाक्षरी मंत्राचा घोष आणि महाआरती, सकाळी 7 ते 8 श्री शिवयोगी सिध्दरामेश्‍वर यांचे पुराण पारायण पठण, सकाळी 9 वा. श्रींच्या गादीस रुद्राभिषेक व बिल्वार्चन पूजा आणि महाआरती सकाळी 9.30 वा.  श्रींचे तांदुळपूजा (महापूजा), सकाळी 10 ते 11. सायं. 8 वा. श्री शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, बिल्वार्चन, शिवपंचाक्षरी मंत्राचा घोष आणि आरती, रात्री 9 वा. पालखी परिक्रमा श्री शिवयोग समाधीस व श्रींच्या मुख्य मंदिरास. रात्री 10 वा. श्रींची गादी पूजा आणि शेजारती.

श्रावणमासाची तयारी पूर्ण
भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीने विशेष दक्षता घेतली आहे. विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग आणि दासोहामध्येही वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.पोलिसांचा बंदोबस्तही मागविण्यात आला असल्याने यंदाचा श्रावणमास सुखकर जाईल, अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया श्री सिध्देश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य गुंडप्पा कारभारी यांनी दिली.