Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Solapur › महसूल देणार्‍या दस्त नोंदणीचाही कारभार प्रभारीवरच

महसूल देणार्‍या दस्त नोंदणीचाही कारभार प्रभारीवरच

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:06PMसोलापूर : प्रशांत माने

शासनाला मोठा महसूल मिळवून  देणार्‍या जमीन, घर खरेदी-विक्री दस्त नोंदणी कार्यालयाचा शहर व जिल्ह्यातील बहुतांशी कारभार प्रभारी अधिकार्‍यांवरच सुरु आहे. शहर व जिल्ह्यातील एकूण 16 पदांपैकी 9 पदे रिक्त असल्याने फक्त 7 अधिकार्‍यांवरच दस्त नोंदणीचा कारभार सुरु आहे. नुकत्याच बंद पडलेल्या सर्व्हरमुळे महसुलावर परिणाम झाला असून यंदाचे वार्षिक उद्दिष्ट्ये 273 कोटी असतानाही चार महिन्यात केवळ 65 कोटीच महसूल  दस्त नोंदणीतून प्राप्त झाल्याची नोंद मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाली आहे.

शहर व जिल्ह्यातील जमीन व घर खरेदी-विक्रीसाठी एकूण 16 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यापैकी उत्तर सोलापूर-1, उत्तर सोलापूर-2, उत्तर सोलापूर-3, पंढरपूर-2, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, वैराग आणि प्रशासकीय अधिकारी अशी 9 पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे अधिकारी दर्जाची पदे रिक्त असताना पदाने कमी दर्जाच्या कर्मचार्‍यांकडे दुय्यम निबंधक कार्यालयाचा पदभार आहे.
गेला महिनाभर सर्व्हर डाऊन असल्यामुळे सात-बारा दाखले मिळत नसल्यामुळे दस्त नोंदणीवर मोठा परिणाम झाला आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास 273 कोटींचे उद्दिष्ट्ये असून एप्रिल ते जुलै या चार महिन्यात केवळ 65 कोटी इतकाच महसूल जमा झाला आहे. गतवर्षी या कार्यालयास शासनाने 255 कोटींचे उद्दिष्ट्ये दिले असतानाही 267 कोटींचा महसूल म्हणजे सुमारे 105 टक्के इतका उद्दिष्टापैकीही जास्त महसूल या कार्यालयाने मिळवला होता. अशा या महसूल देणार्‍या कार्यालयाचाच कारभार प्रभारीवर सुरु असून शासनाचे रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार आता जवळपास ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. 500 रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्कदेखील ऑनलाईन जमा करावयाचे आहे. नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, दस्त हताळणी शुल्क, शोध शुल्क आदी सर्व ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जात असल्याने दुय्यक निबंधक कार्यालयाचा कारभार ऑनलाईन होत आहे. आता घरात बसून नागरिकांना दस्त नोंदणी करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिल्यास या खात्यात शंभर टक्के पारदर्शकता येणार आहे.