होमपेज › Solapur › ‘रे’नगर गृहप्रकल्पाचे प्रजासत्ताकदिनी भूमिपूजन

‘रे’नगर गृहप्रकल्पाचे प्रजासत्ताकदिनी भूमिपूजन

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 22 2018 1:22AMसोलापूर :  प्रतिनिधी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने राबविण्यात येणार्‍या ‘रे’नगर फेडरेशन नामक सुमारे 30 हजार घरकुुलांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी अखेर मुहूर्त सापडला. उपराष्ट्रपती उपलब्ध न होऊ शकल्याने  लांबणीवर पडलेला हा कार्यक्रम आता शुक्रवार, 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते साधेपणाने करण्यात येणार आहे. 

कुंभारी येथे सुमारे 200 एकर जागेतील नियोजित या  प्रकल्पाचे याआधी 25 ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे ठरले होते; मात्र उपराष्ट्रपती नायडू यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आल्याने हा मुहूर्त हुकला. त्यानंतर नायडू यांच्याच हस्ते हा कार्यक्रम होणार, असे वारंवार सांगण्यात आले. यामध्ये तीन महिने वाया गेल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याचे लक्षात घेत अखेर हा कार्यक्रम व्हीव्हीआयपींच्या हस्ते भव्यपणे करण्याच्या इच्छेला मुरड घालत हा कार्यक्रम साधेपणाने करण्याचा निर्णय माकपने घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी म्हणजे शुक्रवार, 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

32 हजार 500 सभासदांची नोंद

‘रे’नगर फेडरेशनची स्थापना 2013 साली  करण्यात आली. यामध्ये विविध गृहनिर्माण संस्थांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. या गृहप्रकल्पांतर्गत शहीद हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे 16 हजार 500, कॉ. मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे 5 हजार, कॉ. मधुकर के. पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे 6 हजार, जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे 1 हजार, हुतात्मा रेडिमेड व शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे 3 हजार, श्री स्वामी समर्थ महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे 500 अशा एकूण 32 हजार 500 सभासदांची नोंदणी करण्यात आली आहे.