होमपेज › Solapur › अक्कलकोटमध्ये रेवणसिद्धेश्‍वर पालखी मिरवणूक उत्साहात

अक्कलकोटमध्ये रेवणसिद्धेश्‍वर पालखी मिरवणूक उत्साहात

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 9:00PMअक्कलकोट : प्रतिनिधी

शहरात महाशिवरात्रीनिमित्त श्री रेवणसिध्देश्‍वर महाराज की जयच्या जयजयकाराने श्री रेवणसिध्देश्‍वर महाराजांची सवाद्य पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. 

शांतलिंगेश्‍वर हिरेमठात सकाळी श्री रेणुकाचार्य मूर्तीचे व श्री शिवलिंगाचे अभिषेक व पूजन वेदमूर्ती श्री सिद्धया स्वामी व वे. मल्लिनाथ स्वामी यांच्या विविध मंत्रोपचाराने करण्यात आले. त्यानंतर मठाचे माजी मठाधिपती लिंगैक्य श्री.ष.ब्र.गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी व काशी विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक लिंगैक्य डॉ. श्रीपती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले. दुपारी ठिक साडेतीन वाजता श्री रेवणसिध्देश्‍वरच्या सवाद्य पालखी मिरवणुकीचा शुभारंभ माजी नगरसेवक रामचंद्र समाणे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी मंदिराचे पुजारी चिदानंद हिरेमठ, षण्मुख हिरेमठ, आडत व्यापारी शिकराया स्वामी, विरुपाक्ष कुंभार, मूर्तीकार रेवणसिद्ध कुंभार, संगीता पाटील, अशोक जवळगीकर, धोंडप्पा कुंभार, प्रशांत कोळी, केदारनाथ कुंभार, लक्ष्मण कुंभार, बसवराज कुंभार आदी उपस्थित होते. ही मिरवणूक कुंभार गल्लीपासून ते धाकटी वेस, राजे फत्तेसिंह चौक, मुख्य रस्ता, कापड बाजार, कारंजा चौक, समाधी मठ, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान, विजय चौक, मंगरुळे पेट्रोल पंप, एवन चौक, स्टेशन रस्ता मार्गे श्री रेवणसिध्देश्‍वर मंदिरपर्यंत निघालेली होती. पालखीचे स्वागत ठिकठिकाणी भाविकांनी जलकुंभासह पंचरत्न आरती ओवाळून करीत होते.पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. 

वीरशैव लिंगायत विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र.बसवलिंग महास्वामी यांच्या दिव्यसान्निध्यात मठात कर्तु गदगीस महारुद्राभिषेक करून महास्वामीजींचा पाद्यपूजा कार्यक्रम झाला. शेवटी उपस्थित भाविकांना फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. प्रसाद वाटप सेवा बी. एफ. फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष महेश तेलुनगी, सचिव सुधीर कलबुर्गी, वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा महानंदा उडचाण, अंबण्णा तेलुनगी, संगीत कलाकार आनंद पाटील, विरेश कोळे व भाविक उपस्थित होते.